जालना

मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला सेनेला मोठा इशारा… बरोबर नाही आलात तरी मोदी सरकार परत आणल्याशिवाय थांबणार नाही’

जालना (न्यूजलाईन)-
‘भाजप हा लाचार पक्ष नसून युतीसाठी याचना करणार नाही, हिंदुत्त्वासाठी एकत्र येणार असतील तर ते येतील. जे येतील त्यांना सोबत घेऊ आणि जे येणार नाही त्यांच्याशिवाय लढणार’, अशी गर्जनाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जालन्यामध्ये सुरू असलेल्या कार्यकारिणीमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी हिंदु्त्वाच्या मुद्याला हात घालत सेनेला इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून युतीबद्दल चर्चा सुरू आहे. भाजप नेत्यांनी युती होणारच असं ठासून सांगितलं आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती का व्हावी यावर आपलं स्पष्टीकरण देत सेनेसह विरोधकांनाही इशारा दिला आहे.

‘भारतीय जनता पक्ष लाचार नाही आहे. होय, आम्हाला युती हवी आहे. पण ही युती देशाच्या कल्याणाकरीता हवी आहे. हिंदुत्त्वावादासाठी एकत्र राहता आले पाहिजे, चोरांच्या हाती सत्ता जाऊ नये, ज्यांनी देशाला लुटले त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये, ज्यांची डोकी हॅक झाली आहे. जे पाकिस्तानशी हातमिळवणी करून काम करत आहे त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये म्हणून आम्ही युतीचा प्रयत्न करत आहोत’, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले की, ‘पण जर कुणाला असं वाटत असेल की, भारतीय जनता पक्ष लाचार आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांचा हा पक्ष आहे. हा पक्ष कधी लाचार होऊ शकत नाही. आम्ही शुन्यातून जग निर्माण केलं आहे. दोन पासून 285 पर्यंत पोहोचलेला हा पक्ष आहे. युतीची काळजी करू नका, ज्यांना हिंदुत्त्वावाद हवा असेल तर ते सोबत येतील आणि ज्यांना नको आहे. ते हिंदुच्या विरोधात आहे त्यांच्यासोबत जातील. जो येणार त्याला घेऊन आणि जो येणार नाही, त्याच्याशिवाय मोदी यांचे सरकार परत आणल्याशिवाय थांबणार नाही.’ असंही ते म्हणाले.

‘लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांना कामाला लागण्याची सुचना देत, आपल्यासोबत आपले मित्र आले तर त्यांनाही निवडून आणू आणि जर ते आले नाही, तर ज्यांनी मोदींसाठी हात वर केला त्याला निवडून आणू’ असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Comment here