इंदापुर

आधी लोकसभा मग बघू विधानसभेचे अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांना फटकारले!

इंदापूरची जागा काँग्रेसला सोडणार नसल्याचे पवारांचे संकेत

इंदापूर, पुणे: (रोखठोक महाराष्ट्र न्युज)
आम्ही सध्या लोकसभेच्या 48 जागांबाबत चर्चा करतोय. आधी आपण लोकसभा निवडणूक जिंकूया मग विधानसभेबाबत चर्चा करू, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसला व पर्यायाने हर्षवर्धन पाटील यांना फटकारले. दरम्यान, इंदापूर विधानसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटलांसाठी सोडणार नाही असे संकेतच अजित पवारांनी दिले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी इंदापूर विधानसभेच्या जागेचा निर्णय झाला तरच, आम्ही सुप्रिया सुळे यांचे लोकसभेसाठी काम करू, अशी भूमिका इंदापूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली होती. मागील आठवड्यात पवार विरोधक पृथ्वीराज चव्हाण इंदापूरात आले होते. त्यावेळी माजी मंत्री व काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस पदाधिका-यांनी इंदापूर विधानसभा जागेचा प्रश्न लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्गी लावावा व ही काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटलांना सोडावी अशी मागणी केली. त्यानंतर काँग्रेसचे युवा नेते विश्वजित कदम यांनीही ही जागा काँग्रेसची असून, हर्षवर्धन पाटलांना सोडावी अशी मागणी केली. त्यामुळे इंदापूरची जागा मिळावी यासाठी हर्षवर्धन पाटील आतापासूनच घायकुतीवर आल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होती तेव्हा ही जागा काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील लढवत होते. मात्र, 2014 साली राष्ट्रवादी व काँग्रेस वेगवेगळे लढल्याने इंदापूरमधून राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा 16 हजार मतांनी दारूण पराभव केला होता.

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीच्या जागावाटप फॉर्म्यूल्यानंतर जी जागा ज्या पक्षाने जिंकली ती जागा आगामी निवडणुकीत त्या पक्षाला सोडली जाईल असे ठरले आहे. मागील तीन- चार निवडणुकीत याच सूत्रानुसार आघाडीचे जागावाटप करून निवडणूक लढविल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार दत्तामामा भरणे यांना ही जागा जाईल या भीतीने हर्षवर्धन पाटील यांची झोप उडाली आहे. तसे झाल्यास हर्षवर्धन पाटलांचे राजकीय करिअरच संपण्याची भीती आहे. त्याचमुळे लोकसभा निवडणूकीपूर्वी इंदापूर जागेचा प्रश्न मिटवा अन्यथा लोकसभेला सुप्रिया सुळे यांचे काम करणार नाही अशी भूमिका हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आडून घेतली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर विधानसभा मतदारसंघ मोडतो. बारामतीमधून सुप्रिया सुळे पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. मात्र, 2014 साली सुप्रिया सुळे केवळ 69 हजार मतांनी विजयी झाल्याने हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव वाढविण्यासाठी लोकसभेपूर्वी इंदापूर जागेचा प्रश्न मिटवा अन्यथा सुप्रिया सुळेंचे काम करणार नाही असा इशारा दिला आहे. मात्र, अजित पवारांनी या धमकीला भीक घातली नाही. सध्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचे काम सुरू आहे. लोकसभा निवडणूक आधी जिंकूया मग विधानसभेचे बघू, अशी रोखठोक भूमिका अजितदादांनी घेतली आहे. तसेच इंदापूरची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडली जाणार असेच संकेत दिले आहेत.

अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय वैर उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे अजित पवारांनी दत्तामामा भरणे या आपल्या कट्टर समर्थकाला ताकद दिली. अजित पवारांनी दत्तामामा भरणे यांना राजकीय ताकद देताना प्रथम जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदावर संधी दिली. नंतर पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. याच काळात भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना जोराची टक्कर दिली. 2009 मध्ये भरणे यांनी अपक्ष लढताना 84 हजार मते घेत मंत्री असलेल्या हर्षवर्धन पाटलांना घाम फोडला होता. पुढे 2014 साली दोन्ही स्वतंत्र लढल्यानंतर भरणे यांनी 20 वर्षे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या हर्षवर्धन पाटलांना 16 हजार मतांनी पराभवाची धूळ चारली होती. आता सहा महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी दत्तामामा भरणे यांनी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे हर्षवर्धन यांची घाबरगुंडी उडाली आहे. मात्र, अजितदादांची खंबीर साथ असल्याने भरणे निश्चित आहेत. इंदापूरची जागा काँग्रेसला सोडल्यास भरणे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरणे यांना भाजपात आणण्यासाठी गळ टाकला आहे. मात्र, ‘अजित पवार हाच आपला पक्ष’ आहे असे सांगून आमदार भरणेंनी अजून तरी आपले पत्ते उघड केले नाहीत.

Comment here