मराठवाडा

बूथ प्रमुखांनी सावध रहावे ; “ईव्हीएम मशीन” तपासा, सरकारवर भरोसा नाही – शरद पवार

बीड :(रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)

सरकारचा काहीही भरोसा नाही. त्यामुळे बूथप्रमुखांनी मतदान दिवशी सकाळी सहा वाजताच जाऊन मतदान यंत्र तपासून पहावी,असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिला आहे.पक्षाचा बीडमधील उमेदवार चार दिवसांत कळविला जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज जिल्ह्यातील बूथप्रमुख आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी पवारांनी हा सल्ला दिला.

पवार म्हणाले की,मी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना दिलासा देणार्या अनेक योजना आणल्या.७२ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी आम्ही दिली होती. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण घटले होते.या सरकारने जाचक अटी लादल्याने निम्म्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळाली नसल्याने शेतकरी आत्महत्या वाढतच असल्याचे त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी कडक टीका केली. पवार म्हणाले की,नरेंद्र मोदी म्हणतात की,देश सुरक्षित हातात आहे. राफेल विमान खरेदीची कागदपत्रे सुरक्षित राहिले नाहीत तर देश सुरक्षित कसा,असा सवाल त्यांनी विचारला.

देशात मतदान यंत्रांचा गैरवापर होत असल्याचा आरोप नेहमीच केला गेला आहे. निवडणुकीत पराभूत झाल्यावर नेहमीच मतदान यंत्रात छेडछाड केल्याचा आरोप होत असतो.यामुळे पवारांनी आपल्या बूथप्रमुखांना मतदान यंत्रांची तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे.अप्रत्यक्षरित्या त्यांनी भाजपवर आरोप केला आहे. आता भाजप या आरोपावर पवारांना काय उत्तर देणार,याची उत्सुकता आहे.

Comment here