सांगली

उद्यापर्यंत अंतर्गत वाद मिटवा, मग सांगलीची जागा द्या – राजू शेट्टी यांचे आवाहन

सांगली (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

महाआघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरुन तिढा अजूनही कायम आहे. सांगलीच्या जागेवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेसला उद्यापर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. आमचा फक्त सांगलीसाठी आग्रह नव्हता, तरीपण, विनाकारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वसंतदादा कुटुंबावर अन्याय केला जात असल्याबाबतचे चुकीचं वातावरण निर्माण केलं जातंय. आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे चुकीचे आहे त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत उद्यापर्यंत निर्णय घ्या असा इशारा राजू शेट्टी यांनी काँग्रेसला दिला आहे. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, प्रतीक आणि विशाल पाटील यांना सुद्धा सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढण्यास आम्ही ऑफर दिली होती. मात्र त्यांनी नकार दिला. सांगलीत स्वाभिमानीकडे दोन ते तीन उमेदवार आहेत, योग्य वेळी जाहीर करू मात्र आघाडीकडून सांगली द्यायची असेल तर कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवून मगच आम्हाला द्या असं राजू शेट्टी यांनी सांगितले. एखाद्या जागेचा विचका करून आम्हाला जर सांगली देत असाल, तर या जागेत आम्हाला रस नाही, असेही आम्ही काँग्रेसला कळवले आहे. बंडखोऱ्या आणि वादग्रस्त झालेली जागा घ्यायची किंवा नाही याचा आम्हाला विचार करावा लागेल असं सांगत राजू शेट्टी यांनी सांगलीच्या बदल्यात शिर्डी किंवा बुलढाणा जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात यावी अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. सांगलीची जागा काँग्रेसकडून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात येणार असल्यावरुन स्थानिक काँग्रेस कार्यकर्तेही नाराज झाले होते. याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हा काँग्रेस कार्यालयाला टाळे ठोकले होते. महत्त्वाचं म्हणजे सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नसल्याचे काँग्रेस नेते प्रतिक पाटील यांनी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले असून यापुढे वसंतदादा पाटील साखर कारखान्याद्वारे समाजकार्य करत राहणार असल्याचे प्रतिक पाटील यांनी सांगितले. यापुढे कोणत्याही राजकारणात भाग घेणार नाही. यापुढे फक्त समाजकारण करणार आहे. काँग्रेसला वसंतदादा घराणे नको आहे. म्हणून मी काँग्रेसचा राजीनामा देत आहे. यापुढे काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले आहे असं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे राजू शेट्टी यांनी सांगलीची जागा घ्यायची झाल्यास पहिलं अंतर्गत वाद मिटवा असा इशारा काँग्रेसला दिला.

Comment here