पुणे

येवलेवाडी विकास आराखडा, मर्सिडीज प्रकरण… आमदार टिळेकरांवर आरोप करू नका… मनसे नगरसेवक वसंत मोरे यांना न्यायालयाचे आदेश

पुणे : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांच्याविरुद्ध येवलेवाडी विकास आराखडा प्रकरणी बदनामीकारक वक्तव्ये करू नयेत, असा आदेश न्यायालयाने मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांना बजावला आहे. दिवाणी न्यायाधीश एस. एच. साळुंखे यांनी याबाबत हा तात्पुरता निकाल दिला आहे. यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासून उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.

येवलेवाडी विकास आराखड्यावरून मोरे आणि टिळेकर या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यावरून वृत्तपत्रे, वाहिन्या सोशल मिडिया येथे जोरदार वादविवाद झाले. त्याविरोधात टिळेकर यांनी बदनामीचा दावा दाखल केला होता.

“मोरे यांनी केलेले आरोप हे सनसनाटी, बदनामीकारक होते. त्यातून माझी मानहानी. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नव्हते. मला वैयक्तिक लाभ झाल्याचा किंवा मला कोणी मर्सिडिज गाडी भेट दिल्याचा आरोप खोटा होता. अशा आरोपांमुळे माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले जात आहेत. त्यामुळे मोरे यांना अशा वक्तव्यांपासून रोखावे, अशी मागणी टिळेकर यांनी न्यायालयात केली होती. तसेच बदनामीपोटी नुकसानभरपाई म्हणून दहा कोटी रूपयांची मागणी केली होती.

टिळेकर यांच्या युक्तिवादाला उत्तर देताना मोरे यांनी आम्ही दोघेही लोकप्रतिनिधी आहोत. हे आरोप लोकहिताच्या दृष्टीने केले होते. येवलेवाडीतील आराखडा बदलात टिळेकर यांचीच महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे या आरोपांत तथ्य आहे, असा दावा केला.

आपल्या युक्तिवादासाठीचे पुरावे मोरे हे देऊ न शकल्याने त्यांनी बदनामीच्या दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत येवलेवाडी विकास आराखडा प्रकरणी टिळेकर यांच्यावर कोणत्याही माध्यमांतून आरोप करू नयेत, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

याबाबत वसंत मोरे यांच्याशी संपर्क साधला असता न्यायालयाने दिलेला निर्णय मला मान्य आहे, आपण आपल्या तज्ञ वकिलांचा सल्ला घेत असून या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे तसेच हे प्रकरण तडीस नेणारअसल्याचे सांगितले.

 

Comment here