पुणे

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 2019 ; सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवला पाहिजे – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन; बालेवाडी येथे वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

 

शानदार संचालन, बहारदार सांकृतिक कार्यक्रम, योगासनच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांच्या सादरीकरणाने स्पर्धेची दिमाखदार सुरुवात
बालेवाडी – (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)
आपला सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवला पाहिजे व सांस्कृतिक कार्यक्रमातून समाज प्रबोधनपर संदेश देण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ नेहमी प्रयत्नशील राहील,
असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. श्री अजित दादा पवार यांनी केले. माजी केंद्रीय कृषिमंत्री मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी मध्ये दिनांक 27 व 28 डिसेंबर 2019 रोजी आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये बोलत होते . याप्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष मा.दिलीप वळसे-पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, क्रीडा व युवक सेवा सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर, आ. चेतन तुपे, आ. सुनील टिंगरे, आ. संजय जगताप, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव मा. बाळासाहेब लांडगे व विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘दबंग’ फेम सिनेअभिनेता अशोक समर्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे व अनेक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण खेळाडू घडवण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धांचे हे आठवे वर्ष आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ध्वजारोहन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध विद्यालय व महाविद्यालयात घडलेल्या आणि राष्ट्रीय पातळीवर विविध खेळांमध्ये नैपुण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंनी हातात मशाल घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश केला व क्रीडा स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन झाल्यानंतर संस्थेच्या विविध शाळातील आणि महाविद्यालयातील एन.सी.सी. गटांचे संचलन सादर करण्यात आले. अतिशय शिस्तबद्ध हालचाली करत विद्यार्थ्यांनी आपल्या गटाचे प्रतिनिधित्व केले. यानंतर खेळाडूंच्या शपथ ग्रहणाचा कार्यक्रम झाला, यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू व क्रीडा शिक्षकांनी खेळाडूंना शपथ दिली.
योगासनाद्वारे गणेश वंदना सादर करुन कार्यक्रमाला सुरूवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी संस्थेमार्फत क्रीडा स्पर्धां आयोजित करण्यामागचा उद्देश व महत्व स्पष्ट केले. ग्रामीण भागातील खेळाडुंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या मधील खेळाडुपणाला वाव मिळावा व या द्वारे अनेक राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे हाच संस्थेचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले. तसेच गेल्या सात वर्षामधे या क्रीडा स्पर्धेद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवर 35, राष्ट्रीय पातळीवर 146 तर राज्य पातळीवर 137 खेळाडुंनी नैपुण्य प्राप्त केल्याचे सांगितले. तसेच ज्या खेलो इंडिया मधे 68 सुवर्ण पदकासह महाराष्ट्र प्रथम आला त्या मधील 2 सुवर्ण पदक हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने पटकावले, ही निश्चीतच अभिमानास्पद बाब आहे असे मत व्यक्त केले.
यानंतर उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा स्वागत सोहळा संस्थेचे मानद सचिव अॅड. संदीप कदम, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र घाडगे, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव श्री. एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) श्री. ए.एम.जाधव यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून अनेक पारितोषिकांचे व पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक कै. बाबुरावजी घोलप साहेब पुरस्कार श्री भैरवनाथ विद्यालय करडे ता. शिरूर चे मुख्याध्यापक श्री. रोहिदास किसन ठाकूर यांना प्रदान करण्यात आला. तसेच संस्थेच्या सर्वगुणसंपन्न शाखेमध्ये प्रथम क्रमांकाचा मान आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाने फटकावला तर निमगाव केतकी, ता. इंदापूर येथील श्री केतकेश्वर विद्यालयाला द्वितीय क्रमांक मिळाला. तसेच सन 2018 – 19 या वर्षी झालेल्या बालेवाडी येथील जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत माध्यमिक / उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विभागातील जनरल चॅम्पियनशिप आकुर्डी गटास प्राप्त झाली. त्याचबरोबर संस्थेच्या शाखांमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळांमध्ये प्राविण्य दाखवून नाव कमावणाऱ्या खेळाडूंचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले ज्या मधे पिरंगुट इंग्लिश स्कूल, पिरंगुट यांनी सैनिक शौर्य गीत, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर यांनी शेतकरी गीत ,श्री वाघेश्वर विद्यालय, चरोली बु यांनी पोवाडा तर इंग्लिश मीडियम स्कूल, खराडी यांनी शिवराज्याभिषेक आधारित सादरीकरण केले.
याप्रसंगी आपल्या शुभेच्छापर संदेशामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी मार्गदर्शन करत असताना सांगितले की आज शिक्षणाच्या पारंपारिक वाटा बदलत आहेत व येत्या दोन वर्षात भारत हा जगामध्ये सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश असेल. त्यामुळे शिक्षणाबरोबरच खेळ देखील अतिशय महत्त्वाचे आहेत व संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या विविध माध्यमांचा वापर करावा असे आवाहन केले.
सिनेअभिनेता अशोक समर्थ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या लहानपणीच्या शैक्षणिक व्यवस्थेची आठवण सांगितली. तसेच खेळाचे महत्व सांगत असताना खेळामधील नैपुण्य फक्त आपल्याला भावी आयुष्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठी देखील फायदेशीर ठरतं कारण बुद्धीच्या जोरावर आपण संपत्ती कमावू शकतो पण निरोगी शरीर विकत घेवू शकत नाही अस मत मांडलं. बालपणापासून विद्यार्थ्यांच्या मनावर खेळाचे व निरोगी आरोग्याचे संस्कार घडवणारे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे कार्य हे अतिशय कौतुकास्पद आहे असे सांगितले तसेच व्यक्तिगत पातळीवर स्वतःला घडवा जेणेकरून देश व राज्य आपोआप घडेल असे आवाहन केले.
विधानसभेचे माजी अध्यक्ष मा. दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये या क्रीडा स्पर्धा मुळे अनेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी भेटली असे सांगितले. आज ज्या क्रीडा नगरीमधे या स्पर्धा होत आहेत त्या शिवछत्रपती क्रीडा नगरीच्या उभारणीमध्ये मा. शरदचंद्रजी पवार साहेबांचे असलेल्या योगदानाबद्दल भाष्य केले कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाबाबत संस्थेचे कौतुक केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री पुणे व जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांनी संस्थेच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक, क्रीडा आणि योगासनातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक केले. नव्या सरकारच्या माध्यमातून खेळासाठी व खेळाडूंसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातील. नवसमाज निर्मितीसाठी अंधश्रद्धा दूर करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच क्रीडा आणि व्यायाम या मध्ये समतोल ठेवला पाहिजे आणि गुणवत्ता वाढीसाठी व स्पर्धेत टिकुन राहण्यासाठी व्यायाम केला पाहिजे असे आवाहन केले आणि भाषणाच्या शेवटी जिंकल्याने हुरळून जाऊ नका व हरल्याने खचून जाऊ नका असा संदेश त्यांनी खेळाडूंना दिला.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सेवक सहकारी पतसंस्था कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे उपसचिव मा. एल. एम. पवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. हरिदास खेसे, प्रा. माधुरी बोरगे यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या प्रेरणेने व संपूर्ण मार्गदर्शनाखाली संस्थेचे मानद सचिव अॅड. संदीप कदम, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र घाडगे, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव श्री. एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) श्री. ए.एम.जाधव यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. यासाठी डॉ. नितीन घोरपडे, डॉ. पंडित शेळके, डॉ. बाळकृष्ण झावरे, डॉ, अशोक भोसले, डॉ.तानाजी साळवे, डॉ. रागिनी पाटील, डॉ. शर्मिला चौधरी, डॉ.एन. बी. टाक यांचे विशेष सहकार्य लाभले.

 

Facebook Page Link

पुणे जिल्हा शिक्षण मंडळजिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 2019सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवला पाहिजे, माजी उपमुख्यमंत्री अजित…

Posted by Rokhthohk Mahararshtra News on Saturday, December 28, 2019

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
5 months ago

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x