महाराष्ट्र

उस्मानाबाद येथे पत्रकारांना पोलीसांकडून धक्काबुक्की; खोटे गुन्हेही दाखल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना निवेदन

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
। मुंबई। प्रतिनिधी ।

झी 24 तास पत्रकार मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की प्रकरणी विचारणा केली असता व या प्रकरणाची पोलीसांकडून सुरु असलेल्या मुस्कटदाबी विरुध्द उठवलेल्या आवाज उस्मानाबाद येथील जेष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांच्या विरुद्धही पोलिसांनी अदखलपात्र खोटा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने राज्यभरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणाची तातडीने राज्य सरकारने दखल घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे.
राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांनी उस्मानाबाद येथील दोन पत्रकारांवर जे जिल्हा पोलीस प्रमुख यांनी खोटे गुन्हे दाखल केले. हे अंत्यत चुकीचे असून प्रथम पत्रकारांवर गुन्हे दाखल करता येतच नाही, पत्रकार हा आपल्या लिखाणातून दिशादर्शक काम करत आहे. चुकीच्या घटकांना तो कधीही आपल्या लेखणीतून समाजासमोर मांडण्याचे काम करत असताना पोलीस यंत्रणा चुकीच्या पध्दतीने पत्रकारांना गुन्हे दाखल करुन त्यांच्या लेखणीवर गदा आणण्याचे काम करत असून या घटनेचा राज्य पत्रकार संघाकडून राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुंडे यांनी दिला.
उस्मानाबाद येथील पोलीस यंत्रणा चुकीचे काम करत असून जो कायदा 1991 साली रदद् करण्यात आला, त्या कायद्याचा आधार घेवून दोन पत्रकारांना गुंतविण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणा करत असेल तर राज्यभर राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करुन काळया फिती लावून पत्रकार कामकाज करतील. तरी तातडीने उस्मानाबाद येथील जिल्हा पोलीस प्रमुख यांनी तातडीने या पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुंडे यांनी दिला आहे.
राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्‍वास आरोटे, राज्य प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव, भगवान चंदे, बाळासाहेब देशमुख, महेश पानसे, सतिश सावंत, राकेश टोळये, किशोर रायसाकडा, अशोक देढे, संजय माळवदे आदींनी या प्रकरणा विरुध्द दोषी विरुध्द कठोर कारवाईची मागणी केली आहे.
तसेच राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, निष्क्रिय आणि भ्रष्ट पोलीस अधीक्षक राजतिलक यांची तातडीने बदली करावी, अशी मागणीही राज्य पत्रकार संघाने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उस्मानाबाद मध्ये पार पडलेल्या साहित्य संमेलनात झी 24 तास पत्रकार मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. याप्रकरणी उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांनी सडेतोड बातम्या देऊन पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांचे वाभाडे काढले होते.
त्यामुळे पोलिसांनी पत्रकार सुनील ढेपे यांचा आवाज बंद करण्यासाठी तसेच मुस्कटदाबी करण्यासाठी सुनील ढेपे यांच्यासह ही पोस्ट शेयर करणारे अदखलपात्र खोटा गुन्हा दाखल केला आहे. राजतिलक रोशन यांनी सन 2016 मध्येही पत्रकार सुनील ढेपे यांच्यासह 3 पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल केला होता, त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

Comment here