पुणे

Lok Down Effect : पुण्यात चौघांनी केली आत्महत्या

वारजेत ब्युटीपार्लरमध्ये काम करणाऱ्या युवतीचा गळफास

पुणे : वारजे भागात एका ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या वीस वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  उघडकीस आली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.

संध्याराणी मुरलीधर चपडवार (वय २०,रा.यशोदीप कॉलनी, चैतन्य चौक, वारजे माळवाडी) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. संध्याराणी एका ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती. तिचे वडील चालक आहेत. चपडवार कुटुंबीय मूळचे उदगीरचे आहे. यशोदीप कॉलनीतील एका घरात ते भाडेतत्त्वावर राहत आहे.

संध्याराणी तीन महिन्यांपूर्वी उदगीरला गेली होती. करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर टाळेबंदी लागू झाली. त्यानंतर ती तेथेच अडकून पडली होती.  दहा दिवसांपूर्वी ती मूळगावावरून परतली. मंगळवारी (३० जून) ती दिवसभर घरीच होती. सायंकाळी पाचच्या सुमारास तिची आई कामावरून घरी परतली. तेव्हा तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.

तिच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. र्निबध शिथिल झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात शहरात आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आर्थिक संकट आणि नैराश्यातून धायरीत एक हॉटेलचालकाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. त्यापाठोपाठ नऱ्हे भागातील एका खाणावळचालकाने तसेच भारती विद्यापीठ भागातील एका हॉटेल कामगाराने आत्महत्या केल्याची घटना घडली.

महाविद्यालयीन युवकाची आत्महत्या

सिंहगड रस्ता भागात एका महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. यश शिवाजी खोपडे (वय २०, रा.नऱ्हे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. यश आणि त्याच्या मित्रांनी नऱ्हे परिसरात भाडेतत्त्वावर सदनिका घेतली होती. बुधवारी रात्री यश घरी आला. त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी त्याचे मित्र घरी आले. तेव्हा यशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

बांधकाम व्यावसायिकाची छतावरून उडी

पुणे : बांधकाम व्यावसायिकाने इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी कोथरूड भागात घडली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.

रामचंद्र लक्ष्मणराव बबलदकर (वय ५५, रा. मुक्ताई हौसिंग सोसायटी, आशिष गार्डन परिसर, कोथरूड) असे आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. बबलदकर मूळचे सोलापूरचे आहेत. तेथे त्यांचा बांधकाम व्यवसाय आहे. कोथरूडमधील सदनिकेत बबलदकर, त्यांची पत्नी आणि मुलगा राहायला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते मधुमेहाने ग्रस्त होते. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास बबलदकर इमारतीच्या छतावर गेले होते. छतावरून कोणी पडू नये म्हणून मोकळ्या जागेत जाळी लावण्यात आली आहे. बबलदकर यांनी जाळी काढली आणि छतावरून सोसायटीच्या मोकळ्या जागेत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर कोथरूड पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. बबलदकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x