पुणे

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह : पुण्यात उडाली खळबळ

पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. स्वतः मोहोळ यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली आहे. करोनाविरोधात लढा देताना खुद्द महापौरांना करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे

ट्वीट करुन महापौर मोहोळ यांनी सांगितले की, “थोडासा ताप आल्याने मी करोनाची चाचणी करुन घेतली. ही चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मात्र, माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.”

पुणे शहरात करोनाचा प्रादुर्भाव सध्या वाढतच आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने शहरात बऱ्यापैकी उद्योग-व्यवसाय सुरु झाले आहेत. लोकांच्या बाहेर फिरण्यावरील निर्बंधही शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळेच शहरात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शहरातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेल्या आणि ज्या भागात जास्त प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत अशा पेठांचा भाग अद्यापही सील करण्यात आला आहे.

पुणे शहरात काल दिवसभरात नव्याने ८०७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर पिंपरीत २७६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. पुण्यातील रुग्णांची संख्या आता १९ हजार ८४९ झाली आहे. तर काल दिवसभरात नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंमुळे पुण्यात आत्तापर्यंत ६८५  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ६१९ जणांची  तब्बेत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १२ हजार २९० रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.

Comment here