मुंबई

घरात बसून सरकार चालविणारा मुख्यमंत्री पाहिला नाही – नारायण राणे यांची टिका

मुंबई : महाराष्ट्राच्या इतिहासात घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही असा प्रहार करतानाच,घरात बसून सरकार चालवता येतं का ? सरकारी यंत्रणेवर कोणताही अंकुश नाही, राज्यातील सपशेल अपयशी ठरले असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी केली आहे.

एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना माजी मुख्यमंत्री राणे यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला आहे.राज्यात भाजपा चांगले सरकार देऊ शकते असे सांगतानाच महाराष्ट्राच्या इतिहासात घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असणारे अंतर्गत वाद पाहता हे सरकार एक वर्ष तरी चालेल का अशी  शंका  आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रोज नवीन आदेश काढले जात आहेत पण अंमलबजावणी होताना दिसत नाही.राज्यातील सरकार बदलल्याशिवाय कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबणार नाहीत असे स्पष्ट करताना,राज्य सरकार बेजबाबदारपणे वागत आहे असा आरोप राणे यांनी केला.

देशातील कोरोना बाधितांचा आकडा वाढण्यास राज्य सरकार जबाबदार आहे असे सांगून,सध्या रुग्णांची अवस्था काय आहे असा सवाल त्यांनी करून,या सरकारमध्ये कोरोनावर मात करण्याची क्षमता नाही असा टोला लगावला.कोरोनाच्या परिस्थिती लोकांचे व्यवहार  पूर्णपणे बंद आहेत, राज्यातील जनता त्रस्त झाली आहे. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे काय ? केवळ घरात बसून सरकार चालवता येतं का असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता यावर बोलताना राणे म्हणाले की, पवार प्रस्ताव  एकाच पक्षाला देतात का?

Comment here