पुणे

पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सापळा रचून अटक

पुणे :  – जीवाला धोका असल्याने पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या जनता वसाहतीमधील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीची 2 पिस्तुले आणि 8 काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

आदिनाथ उर्फ आदित्य सोपान साठे (वय 25 रा. जनता वसाहत, पर्वती पायथा, सध्या रा. सिद्धार्थ अपार्टमेंट, रायकर मळा, धायरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

साठे सराइत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. जनता वसाहतीतील सराइत गुन्हेगार कुणाल कानडे व निलेश वाडेकर यांचा साथीदार आहे. सिंहगड रस्त्यावरील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत साठे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस कर्मचारी रमेश राठोड यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा लावून साठेला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीची 2 पिस्तुले आणि 8 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. चौकशीत त्याने जीवाला धोका असल्याने पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती दिली आहे. त्याने हे पिस्तुल कोणाकडून आणले आहेत याचा तपास सुरू आहे.

पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहाय्यक निरीक्षक भालचंद्र ढवळे, सुनील पवार, सचिन ढवळे, भालचंद्र बोरकर, सुहास कदम यांनी ही कारवाई केली.

Comment here