पिंपरी-चिंचवड

करोनामुळे अवघ्या दहा दिवसांच्या अंतराने तीन सख्ख्या भावांचा मृत्यू

पिपरी: पिपरीतील रहिवासी असलेल्या तीन सख्ख्या भावांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दहा दिवसांच्या अंतराने झालेल्या या तीन मृत्यूंमुळे या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

एकत्र कुटुंबात राहणारे हे तीनही बंधू ६० पेक्षा अधिक वयाचे होते आणि तिघांनाही जोखमीच्या आजाराची पार्श्वभूमी होती. सर्वात थोरल्या बंधूंना सर्वप्रथम करोनाची लागण झाली. त्यानंतर, खबरदारी म्हणून कुटुंबातील सर्वाची तपासणी करण्यात आली. तेव्हा लहान, मोठय़ा सर्वानाच करोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, चिंचवडच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. उपचारादरम्यान त्यातील एकाला श्वसनाचा आजार बळावला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पाच दिवसाने दुसऱ्याचा तर त्यानंतरच्या दोन दिवसानंतर तिसऱ्या भावाचा मृत्यू झाला. अवघ्या दहा दिवसांच्या अंतराने तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्याचा मृत्यू

पिपरी पालिकेच्या वैद्यकीय विभागातील एका अधिकाऱ्याचा मंगळवारी करोनामुळे मृत्यू झाला. ११ जुलैला तपासणीनंतर त्यांचा अहवाल सकारात्मक आला होता. १४ जुलैला त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी त्यांना यशवंतराव चव्हाण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांचे निधन झाले.

Comment here