महाराष्ट्र

राष्ट्रवादीला भाजपचा धक्का, “विजयसिंह मोहिते पाटील पिता पुत्र” भाजपमध्ये, “रणजितसिंह मोहिते पाटील” भाजपकडून रिंगणात

अकलूज (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. या संदर्भात आज दुपारी ते कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. शिवरत्न बंगल्यावर होणाऱ्या बैठकीत विजयसिंह मोहिते-पाटील भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय का घ्यावा लागला, यावर बोलणार आहेत. राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्यानं मोहिते-पाटील भाजपात जाणार आहेत. विजयसिंह यांचे पुत्र रणजीतसिंह माढ्यातून लोकसभा लढवणार आहेत. मुंबईत उद्या त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. माढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. हा बालेकिल्ला बांधण्यात मोहिते-पाटील कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. माढ्यातील कार्यकर्त्यांची फळी अतिशय मजबूत असल्यानंच गेल्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माढ्याचा गड राखला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या दोन याद्यांमध्ये मोहिते-पाटील यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळेच विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे पुत्र रणजीतसिंह यांना भाजपानं माढ्यातून उमेदवारी देऊ केली आहे. उद्या मोहिते-पाटील भाजपामध्ये प्रवेश करतील. काही दिवसांपूर्वी रणजितसिंह मोहिते-पाटलांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते भाजपात प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदार संघात भाजपाकडून रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. जिल्ह्यातील महाआघाडीचे नेते आमदार प्रशांत परिचारक, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आदी नेत्यांना याबाबतची माहिती दिली आहे. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सायंकाळी मुंबईत बोलावून घेतले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. पण त्यांनी करमाळा विधानसभा मतदार संघातच रस असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपाकडून रणजितसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

Comment here