पुणे

खेड घाट बायपास रस्त्याचे व विद्युतीकरणाचे काम लवकर पूर्ण करा – खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे – खेड घाट बायपास रस्त्याचे व विद्युतीकरणाचे काम लवकर पूर्ण करा, तोपर्यंत नाशिकच्या दिशेने जाण्यासाठी जुना रस्त्यावर एकेरी वाहतूक करा. तसेच बायपास रस्त्याची एक मार्गिका पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुली करुन वाहनचालकांना दिलासा द्या, अशा सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिल्या.

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरुनगर ते आळेफाटा दरम्यानच्या राजगुरुनगर, खेड घाट, मंचर, कळंब, नारायणगाव आणि आळेफाटा येथील बायपास रस्त्यांच्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी डॉ. कोल्हे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. हळनोर व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत खेड घाट बायपास रस्त्याच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरु आहे. तसेच महावितरणकडून इस्टिमेट मंजुरी झाली नसल्याने विद्युतीकरणाचे काम होऊ शकलेले नाही, अशी माहिती प्रकल्प संचालक चिटणीस यांनी दिली. महावितरणकडून इस्टिमेट करण्यास होणाऱ्या विलंबाबद्दल डॉ. कोल्हे यांनी नापसंती व्यक्त करीत येत्या ३-४ दिवसांत विद्युतीकरणाच्या इस्टिमेटला मंजुरी द्या अशी सूचना श्री. हळनोर यांना केली.

बायपास रस्त्यालगतच्या डोंगराचे पावसाळ्यात भूस्खलन होऊन राडारोडा रस्त्यावर आल्यास अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यातून मनुष्यहानी होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना करावी, असे निर्देशही डॉ. कोल्हे यांनी दिले.

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी हा अतिशय महत्त्वाचा विषय असून कामे होण्यातील दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये असलेला असंतोष लक्षात घेऊन लोकसभा निवडणूक झाल्यावर डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी पत्रव्यवहार केला. तसेच बैठका घेऊन सहाही बायपासच्या कामांची निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. त्यानुसार प्राधान्याने सर्वप्रथम नारायणगाव व खेड घाट बायपास बायपासची कामे सुरू झाली. या दोन्ही बायपास रस्त्यांची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतुष्टतेची भावना असून खासदार डॉ. कोल्हे यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नाबद्दल नागरिक आणि वाहनचालकांनी आनंद व्यक्त केला जात आहे.

दरम्यान सद्यस्थितीत वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी खेड घाट बायपास रस्त्याची एक मार्गिका पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुली करावी, तर जुना घाटरस्ता नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी एक दिशा मार्ग करावा, म्हणजे सणाच्या काळात वाहतूक कोंडी टाळता येईल असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x