मुख्य

#IPL2020 #Final : मुंबई इंडियन्सने पटकावले विजेतेपद

दुबई – कर्णधार रोहित शर्मांच्या शानदार अर्धशतकी आणि ईशान किशनच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेटनीं पराभव करत विजय संपादित केला. या विजयासह मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात विजय मिळवत आयपीएल स्पर्धेचे पाचवे विजेतेपद पटकावले आहे.

विजयासाठीचे 157 धावांचे आव्हान मुंबईने 18.4 षटकांत 5 गडी गमावत पूर्ण केले. मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहित शर्माने आपली जबाबदारी ओळखत 51 चेंडूत (5 चौकार व 4 षटकार) 68 धावा करत तर ईशान किशनने 19 चेडूंत (3 चौकार आणि 1 षटकार) नाबाद 33 धावा करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. याव्यतिरिक्त डी काॅकने 20(12), सूर्यकुमारने 19(20), कायरन पोलार्डने 9(4) तर हार्दिक पांड्य़ाने 3(5) धावा केल्या. क्रुणाल पांडया 1 धावेवर नाबाद राहिला.

दिल्लीचा प्रमुख गोलंदाज कगिसो रबाडाने अंतिम सामन्यात निराशा केली. त्याच्याकडून अपेक्षा असताना त्याने 3 षटकात 32 धावा देत 1 गडी बाद केला. एनरिक नाॅर्टजेने 2.4 षटकात 25 धावा देत 2 तर मार्कस स्टोईनिसने 2 षटकात 23 धावा देत 1 गडी बाद केला.

तत्पूर्वी, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत मुंबईला गोलंदाजी दिली होती. दिल्लीची सुरूवात खराब झाली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर ट्रेंट बोल्टने मार्कस स्टोईनिसला शून्यावर डी काॅककरवी झेलबाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला. त्यानंतर दुसऱ्या षटकांच्या चौथ्या चेंडूवर अंजिक्य रहाणे 2(4) तर तिसऱ्या षटकांच्या तिसऱ्या चेंडूवर शिखर धवन 15(13) माघारी परतला. रहाणेला बोल्टने डी काॅक करवी झेलबाद केलं तर धवनला जयंत यादव याने त्रिफळाचित केलं.

धवन बाद झाला तेव्हा दिल्लीची 3 बाद 22 अशी अवस्था होती. त्यानंतर कर्णधार श्रेय्यस अय्यर आणि रिषभ पंत यांनी सूत्रे हाती घेत चौथ्य़ा विकेटसाठी 96 धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या 15 षटकांत 118 वर नेली. रिषभ पंतला कूल्टर नाइलने हार्दिक पांड्याकरवी झेलबाद करत दिल्लीला चौथा धक्का दिला. पंतने 38 चेंडूत (4 चौकार व 2 षटकार) 56 धावा केल्या. त्यानंतर अय्यरने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर शिमरन हेटमायर 5(5) आणि अक्षर पटेल 9(9) धावांवर माघारी परतला. मात्र, कर्णधार अय्यरने एक बाजू संभाळत 50 चेंडूत (6 चौकार व 2 षटकार) नाबाद 65 धावा करत संघाची धावसंख्या 20 षटकांत 7 बाद 156 पर्यंत नेली.

मुंबईकडून गोलंदाजीत ट्रेंट बोल्टने 4 षटकांत 30 धावा देत सर्वाधिक 3 तर नाथन कूल्टर नाइलने 4 षटकांत 29 धावा देत 2 गडी बाद केले. तर जयंत यादवने 4 षटकांत 25 धावा देत 1 गडी बाद केला.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x