मुंबई

वंजारी समाजात फूट पाडण्याचा भाजपचा डाव, शिवसेनेच्या टीकेवर पंकजा मुंडेंचं प्रत्युत्तर

मुंबई – केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या नाराज नसल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचे समर्थक नाराज आहेत. त्यामुळेच, सोशल मीडयात मुंडे भगिनींना भाजपात डावलले जात असल्याची चर्चा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन आपण नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच, शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून मांडलेल्या मताबद्दलही मत व्यक्त केलंय.

मंत्रीमंडळ विस्तारात प्रीतम मुंडेंना स्थान न दिल्याने तिसऱ्यांदा मुंडे भगिनींना भाजपने धक्काच दिला नाही, तर औरंगाबादच्या डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद देऊन पर्यायी नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा मुंडे समर्थकांत आहे. एकापाठोपाठच्या घटनांमुळे पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे या भगिनींची नाराजी या राजकीय मौनातून उघड उघड दिसत आहे. यावर, सामनाच्या अग्रलेखातूनही मत व्यक्त करण्यात आलं आहे.

भाजपाचे नेते डॉ. भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेलं. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठीच हे केले काय?. असा सवाल उपस्थित करत शिवसेनेनं शंका व्यक्त केली होती. त्यावर, पंकजा मुंडेंनी मत व्यक्त केलं आहे. मी तो लेख वाचला नाही, लेख वाचल्यानंतर त्याबाबत प्रतिक्रिया देईल, असे पंकजा यांनी म्हटले. तसेच, संजय राऊत यांची मतं स्ट्राँग आहेत, त्यांनी माझ्याशी बोलून ते लिहिलं नाही, असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले.

मुंडे समर्थकांमध्ये नाराजी

गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंडे यांनी ओबीसी नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतली. ‘जनतेच्या मनातील मी मुख्यमंत्री’ असे वक्तव्य करून पंकजा मुंडे यांनी नाराजी दाखविली होती. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुंडेंनी ‘आम्ही मुंबईतच आहोत,’ असे एकच ट्विट केले होते. त्यानंतर मात्र त्या माध्यमांशी काहीही बोलल्या नाहीत. त्यांच्या समर्थकांनी मात्र समाज माध्यमाद्वारे संताप व्यक्त केला आहे.

दोघींना बदनाम करु नका : फडणवीस

मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा निरर्थक असल्याचे सांगतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदाच्या वाटपाबाबत सर्व समाधानी आहेत, उगाच भांडणे लावू नयेत. कुणालाही अकारण बदनाम करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असा इशारा दिला.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x