पुणे

पुण्याच्या खासदारांना जनतेचा विसर पडला – माजी आमदार मोहन जोशी यांची टीका

पुणे : इंधन आणि घरगुती गॅसची दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंची महागाई झालेली असताना, पुण्याचे खासदार त्याविरोधात चकार शब्द काढत नाहीत. सत्तेच्या लोभामुळे सामान्य जनतेच्या प्रश्नांशी त्यांना देणेघेणे नाही. जनतेचा त्यांना विसर पडला आहे, अशी टीका माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

पेट्रोल, डिझेल आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ पुणे शहर काँग्रेस कमिटी आणि कसबा ब्लॉक कॉंग्रेस यांच्यावतीने सोमवारी सायकल रॅली काढण्यात आली. डुल्या मारुती चौकापासून रॅलीची सुरुवात करण्यात आली. सोन्या मारुती चौक, मोती चौक, सात तोटी चौक, शिंपी आळी, काका वडके यांचे घर अशा मार्गाने रॅलीचा समारोप कसबा गणपती मंदिराजवळ खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर जाहीर सभेने करण्यात आला.

पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. घरगुती गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे. गेले तीन महिने पेट्रोल, डिझेल यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने अन्य वस्तूंचीही दरवाढ झालेली आहे. साखर, खाद्यतेल, धान्य या सगळ्याच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढून महागाईने कळस गाठला आहे. महागाईमुळे जनता हैराण झाली असताना महागाई विरोधात आवाज उठवण्याऐवजी पुण्याचे खासदार झोपलेले आहेत. त्यांना जागे करण्यासाठी त्यांच्या कार्यालयासमोर आजचे आंदोलन करण्यात आले आहे, असे माजी आमदार मोहन जोशी यांनी सभेत बोलताना सांगितले. संसदेचे अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात तरी पुण्याच्या खासदारांनी महागाईविरोधात आवाज उठवावा, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली.

या सभेत कमलताई व्यवहारे, वीरेंद्र किराड यांची भाषणे झाली. सुरेश कांबळे यांनी आभार मानले.

रॅलीमध्ये अॅड.अभय छाजेड, कसबा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण करपे, जयसिंग भोसले, बंडू शेडगे, बबलू कोळी, संदीप आटपाळकर, योगेश भोकरे, मयूर भोकरे, परवेझ तांबोळी, शैलेश भोकरे, अभिजित महामुनी, कुणाल जाधव,साहील राऊत, धनंजय माने, सोनवणे आदींनी भाग घेतला होता.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x