पुणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केडगाव (ता.दौंड) येथील रहिवासी असणाऱ्या स्वप्निल लोणकर याच्या कुटुंबीयांवर असलेले 20 लाखांचे कर्ज फेडण्यासाठी भाजपने लोणकर कुटुंबियांना मोठा आधार देत आज देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सुमारे 19 लाख 96 हजार 965 रूपयांचे लोणकर कुटुंबियांवर असणारे कर्ज फेडले आहे. दौंडचे आमदार राहुल कुल, आ.गोपीचंद पडळकर तसेच विधान परिषदेेेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर याांनी लोणकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
MPSC परीक्षा पास होऊनही पोस्टिंग मिळत नसल्याने स्वप्नील लोणकर या युवकाने आत्महत्या केली होती.
यावेळी स्वप्निल लोणकर याच्या कुटुंबीयांवर शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचे सुमारे 19 लाख 96 हजार 965 रूपयांचे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडावे हा मोठा प्रश्न लोणकर कुटुंबियांना पडला होता. मात्र आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना वरील रकमेचा धनादेश खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला.
स्वप्निल लोणकर याचे वडिल सुनील लोणकर यांनी हा धनादेश स्वीकारला.
स्वप्नील लोणकर च्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. त्यातच त्या कुटुंबावर असणारे कर्ज हे या कुटुंबाला अन्न गोड लागू देत नव्हते. मात्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने या कर्जाची संपूर्ण रक्कम देऊन त्यांना खूप मोठा आधार देण्याचे काम भाजप च्या वतीने करण्यात आले आहे.
स्वप्निलची पार्श्वभूमी
स्वप्निल सुनील लोणकर (वय 24) असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. स्वप्निल हा सिव्हिल इंजिनिअर (Civil engineer) होता आणि त्यानं मोठ्या जिद्दीनं MPSC ची परीक्षा दिली होती आणि उत्तीर्णही झाला होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याला नोकरी मिळाली नव्हती.
इंजिनिअरींग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानं MPSC च्या परीक्षेची तयारी सुरु केली. स्वप्निल 2019 मध्ये झालेल्या एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाला होता. मात्र कोरोनाच्या निर्बंधामुळे त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झाली नव्हती. 2020 साली त्याने पूर्व परीक्षाही दिली. त्यातही तो उत्तीर्ण झाला.
स्वप्निलला दहावीत 91 टक्के मिळाले होते. तो अनेक सामाजिक उपक्रमांमधेही तो सहभागी असायचा. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालो की वडिलांनी गावाकडे घर बांधण्यासाठी घेतलेले कर्ज फेडाण्याचं स्वप्निलच स्वप्न होतं.