पुणे

“औंधचा भाऊ” क्रुरकर्मा सावकार गायकवाड पितापुत्राला डबल मोका… पण अटक कधी होणार?

पुणे, दि. 17 ऑगस्ट: सावकार नानासाहेब गायकवाड व त्याचा मुलगा केदार उर्फ गणेश गायकवाड याच्यावर पुणे व पिंपरी पोलिसांनी मोका कायद्यानुसार कारवाई केली खरी मात्र, विविध गुन्हे दाखल होत असताना हे पिता-पुत्र पोलिसांना सापडायला तयार नाहीत. सावकारी आणि लोकांच्या जमिनी लुटीतून कमावलेला अफाट पैसा आणि गायकवाडचा मावस“भाऊ” आमदार लक्ष्मण जगताप हे हस्तक्षेप करत नाही ना? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

नानासाहेब गायकवाडवर अवैध खासगी सावकारी केल्याबाबतचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. प्रतिष्ठीत व महत्वाच्या व्यक्तींशी संबंध निर्माण करून गरजू व्यक्तींना बेकायदेशीरपणे व्याजाने पैसे देत, त्यांच्याकडून मुद्दल, व्याजासह पैसे घेण्याबरोबरच त्यांच्या मालमत्ता बळकावून बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गायकवाड पिता-पुत्रांसह पाच जणांवर मोकाची कारवाई करण्यात आली आहे. आरोपी १) नानासाहेब शंकरराव गायकवाड, २) नंदा नानासाहेब गायकवाड ऊर्फ भाऊ, ३) गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड रा.सर्व एनएसजी हाऊस औंध पुणे, ४) सोनाली दिपक गवारे,वय ४० वर्षे, ५) दिपक निवृत्ती गवारे,वय ४५ वर्षे, दोघेही रा. १२०४/१६, गजानन महाराज मंदीर, संभाजी बागेजवळ, शिवाजीनगर, पुणे., ६) राजु दादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ रा. सर्वोदय रेसिडेन्सी, ए विंग, फ्लॅट नं.२,विशालनगर, पिंपळे निलख, पुणे कायम रा.मु.पो.भोकर, ता.श्रीरामपुर, जि.अहमदनगर पुणे., ७) सचिन गोविंद वाळके, ८) संदीप गोविंद वाळके दोघेही रा.विधाते वस्ती औंध पुणे यांचेविरुद्ध गुन्हा दाखल असुन दाखल गुन्ह्याचा तपास सपोआ विश्रामबाग विभाग हे करीत असुन, तपासात असे निष्पन्न झाले की, वरील आरोपीतांनी बेकायदेशीर मार्गाने स्वतःस व इतर साथीदारांस आर्थिक फायदा मिळविण्यासाठी पिडीत व्यक्तिस अवैधरीत्या व्याजाने पैसे देवून ते वसूल करण्यासाठी रीव्हॉल्व्हरचा वापर करून, हवेत गोळीबार करून,जिवे मारण्याचा प्रयत्न करून, हिंसाचार करणेची धमकी देवून आणि धाकदपटशा दाखवून जबरदस्तीने जमीनीच्या मालकी बाबतचे दस्तऐवज स्टॅम्प पेपर, लिहलेले व कोरे पेपरवर सहया व अंगठे घेणे अशा प्रकारच्या गुन्ह्याच्या पद्धतींची माहीती मिळाली आहे. त्यामध्ये व्याजाचे व्यवसायातुन लोकांच्या जागा व वाहने बळकावल्याची माहीती प्राप्त असुन अशा व्यवहारांतुन मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी संपत्ती जमावल्याचा संशय आहे.

मुख्य आरोपी नानासाहेब शंकरराव गायकवाड ऊर्फ भाऊ सह त्याच्या साथीदारांविरोधात मागील काही वर्षाच्या कालावधीमध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी व जबर दुखापतीसाठी पळवुन नेणे, दुखापत करणे, बेकादेशीर जमाव जमविणे, कट रचून बनावटीकरण करून फसवणूक करणे, डांबून ठेवणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक अग्नीशस्त्र बाळगणे, अवैधरीत्या पठाणीपद्धतीने सावकारी करणे वगैरे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. गायकवाड याच्यावर मोकाची कारवाई झाल्यानंतर त्यांच्या अनेक क्रुर कहाण्या जगासमोर येऊ लागल्या आहेत. 

दरम्यान, गणेश गायकवाड हा कॉंग्रेसचा पदाधिकारी होता. त्यास पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. नानासाहेब गायकवाड व त्याचा मुलगा गणेश गायकवाड याच्या कृत्याने उद्योगजगत व राजकारणात खळबळ माजवली आहे. अफाट पैसा व इस्टेट कमावून देखील मुलाला आमदार करण्यासाठी सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे अनेक दृष्कृत्ये तसेच क्रुरकहाण्या जगासमोर येऊ लागल्या आहेत. आमदार व मंत्री होण्याच्या हव्यासापोटी आध्यात्मिक गुरू रघुनाथ येमुलच्या सांगण्यावरून सुनेचा आतोनात छळ करण्यात आल्याप्रकरणी सर्वांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सारा प्रकार उघडकीस आला असून त्यानंतर जमीन बळकावण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.

 गायकवाडविरुद्ध गेल्या महिन्यात दरोड्याचा गुन्हा नोंद झालेला आहे. त्यात पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिकाच्या पिंपळे निलख येथील साईटवर जाऊन गणेश, त्याचे वडिल व साथीदारांनी काम बंद पाडले. तसेच पुन्हा इकडे फिरकला, तर दहावेळा फायरिंग करेन, असे  धमकावले होते. तर, त्याअगोदर पिंपरी-चिंचवडमधीलच हिंजवडी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध नऊ कोटी रुपयांची जमीन बळकावून फसवणूक केल्याचा गुन्हा जून महिन्यातच नोंदविण्यात आलेला आहे. तसेच पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची सूस (ता.मुळशी.जि.पुणे) येथील एक एकर जागा गायकवाडांनी बळकावून त्यांची फसवणूक केली गेली आहे. तसेच 20 लाख रुपयाच्या मुद्दलेबदल्यात 85 लाख रुपये व्याज्याच्या पैशापायी रायगड येथील 7 एकर जागा आणि पुण्यातील 4 गुंठे जागा बळजबरिने जमीन लाटण्यासाठी डोक्याला पिस्तूल लावून हवेत गोळीबार केला.

दरोडा, खंडणी, गोळीबार, अपहरणासह अवैध सावकारी व इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल असूनदेखील गायकवाड पितापुत्र अद्याप मोकाट फिरत आहेत. गायकवाड कुटुंबिय व साथीदारांविरुद्ध एकामागोमाग एक गुन्हे दाखल होत आहेत. पिंपरी-चिंचवडसह पुण्यातही (चतुशृंगी पोलिस ठाणे) गुन्हे दाखल होऊनही गणेश व त्याचे वडील नानासाहेब यांना पकडण्यात पोलिसांना अपयश असल्याचे दिसून येत आहे. पुणे व पिंपरी शहरात आपल्यासारखे डॅशिंग पोलिस आयुक्त असूनही गायकवाड पितापूत्र फरार असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. गणेश व नानासाहेब आणि त्यांचे साथीदार तसेच नानासाहेबांची मुलगी सोनाली व जावई दीपक गवारे यांच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न करणे, खंडणी व दंगलीचा गुन्हा दाखल झाला. त्यात सोनाली व दीपक गवारे यांना अटक झाली. मात्र, गायकवाड पितापूत्र फरारच आहेत. चतुशृंगींच्या सदर दोन गुन्ह्यांसह पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल तिन्ही गुन्ह्यातही गायकवाडांना दोन महिन्यानंतरही अटक झालेली नाही. 

मुख्य आरोपी नानासाहेब शंकरराव गायकवाड हा टोळीप्रमुख असून त्याने कुटुंबातील सदस्य व इतर विविध साथीदारांसह गुन्हे केले आहेत. तसेच स्वतःच्या अधिपत्याखाली,संघटीत गुन्हेगारी टोळी कुटुंबियांसह निर्माण केली आहे. प्रतिष्ठीत तसेच महत्त्वांच्या व्यक्तींसोबत संबंध स्थापित करुन तसेच गरजु व्यक्तींना बेकायदेशीररित्या व्याजाने पैसे देवुन त्यांच्याकडुन बेकायदेशीररित्या मुद्दल व व्याज उकळण्यासाठी किंवा त्यांच्याकडुन जबदरस्तीने दस्तऐवज बनवुन त्यांचे स्थावर वा जंगम मालमत्ता बळकावुन त्यातुन अवैध आर्थिक फायदा करुन घेण्याचा उद्देशाने त्यातून बेहिशोबी संपत्ती जमा केली आहे.

लोकांच्या घर जमीन, शेतजमीन इतर मिळकत स्वतःच्या व कुटुंबातील साथीदारांच्या नावावर करुन जबरदस्तीने व बनावटरित्या दस्तऐवज तयार करुन त्यांचेकडुन स्वतःचा तसेच त्याचे गुन्हेगारी टोळीतील इतर सदस्यांचा आर्थिक फायदा व्हावा यासाठी आपल्या संघटीत टोळीची दहशत निर्माण केली आहे. त्याच्या अशा वागण्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या मनामध्ये/प्रतिष्ठीत नागरिक, व्यवसायिकांच्या मनात भिती निर्माण होवुन भितीपोटी बहुतांश प्रतिष्ठीत नागरिक,व्यवसायिक, सर्वसामान्य नागरिक हे त्यांचेविरुध्द गुन्हेगारी कारवायांबाबत तक्रार देणेस धजावत नाहीत. मात्र आता डबल मोकाची कारवाई झाल्यानंतर अनेक पिडित गायकवाड विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत.

या अनुषंगाने मा.श्री पंकज देशमुख पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर यांचे मार्फतीने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(१)(ii), ३(२),३(४),३(५) चा अंतर्भाव करणेस महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम २३(१) (अ) अन्वये अंर्तभाव होणेबाबतची मंजुरी मिळणेकामी प्रस्ताव सादर केला असता मा. श्री नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(१)(ii), ३(२), ३(४), ३(५) चा अंतर्भाव करणेचे आदेश पारीत केलेले आहेत.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह आयुक्त,पुणे शहर डॉ.रविंद्र शिसवे, मा.अप्पर पोलीस आयुक्त,पुर्व प्रादेशिक विभाग,श्री.नामदेव चव्हाण, मा.पोलीस उपआयुक्त,परिमंडळ ४.श्री.पंकज देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त,विश्रामबाग विभाग,श्री.बजरंग देसाई, समीर चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक,चतुःश्रृंगी पोलीस ठाणे,श्रीमती.सुप्रिया पंढरकर, पोलीस उप निरीक्षक,चतुःश्रृंगी पोलीस ठाणे, व पोलीस स्टाफ यांचे पथकाने केली आहे. मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचाली वर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ४८ वी कारवाई आहे.