पुणे

मोटारीची काच फोडून पाच लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी केली लंपास – अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

हवेली प्रतिनिधी :- अमन शेख
हवेली तालुक्यातील उरुळी कांचनमधील डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेसारख्या गजबजलेल्या ठिकाणाहून दहा दिवसांपूर्वीच भरदिवसा मोटारीची काच फोडून ५० हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ताजी असतानाच पुणे-सोलापूर महामार्गावरील हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील अॅक्सिस बँकेच्या शेजारी लावलेल्या मोटारीची काच फोडून पाच लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना गुरुवारी (दि. ११) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर हनुमंत तुपे (वय २६, रा. थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) हे कदमवाकवस्तीतील अॅक्सिस बँकत पैसे भरण्यासाठी गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आले होते. त्यांच्याकडे ७ लाख ५० हजार रुपये होते. सागर हे २ लाख ५० हजार रुपये बँकेत भरण्यासाठी गेले होते. तर उर्वरित ५ लाख रुपये त्यांच्या कारमध्ये होते.
सागर बँकेतून पैसे भरून आल्यानंतर त्यांनी पाहिले असता त्यांच्या कारजवळ दोन अनोळखी इसम होते. सागर यांना येताना पाहताच दोन्ही अनोळखी इसम दुचाकीवरून पळून गेले. सागर यांनी कारजवळ जाऊन पाहिले असता त्यांना डाव्या बाजूची काच फुटलेली दिसली. तसेच कारमध्ये ठेवलेले ५ लाख रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.