पुणे

पतीपत्नी च्या वादातून पती ने केली आत्महत्या-उरुळी कांचन येथील घटना..

प्रतिनीधी : स्वप्नील कदम

लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरात होणाऱ्या कौटुंबिक वादातून एका ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. एक महिन्यापूर्वी हा प्रकार घडला. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी संबंधित तरुणाच्या पत्नी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
महावीर उत्तम जगदाळे (वय ३२) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी रजनी महावीर जगदाळे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणाचे वडील उत्तम श्रीराम जगदाळे (वय ५८) मु.पो.तरडगाव ता.करमाळा जिल्हा सोलापूर यांनी या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ८ नोव्हेंबरला हा प्रकार घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावीर आणि रजनी या दोघांचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुलेही आहेत. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उरळीकांचन गावात हे दोघे पती-पत्नी राहत होते. पती मोलमजुरीचे काम करता होता. तर पत्नी बांधकाम साईटवर मजुरीचे काम करत होती. लॉकडाऊनमध्ये पतीने काम सोडले होते. त्यानंतर तो गावाला गेला होता. गावावरून परतल्यावरही तो घरीच बसून असल्याने पती आणि पत्नीमध्ये वाद होऊ लागले.पती ऐकत नसल्याने पत्नीने सासऱ्यांकडे पतीची तक्रारही केली होती. सासऱ्यांनी समजून सांगूनही पतीने पुन्हा कामाला सुरुवात केली नाही. दोघांमध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या कारणाच्या वादावरून महावीर जगदाळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु तपासादरम्यान महावीर याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली. त्यामुळे त्याने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.