पुणे

वाहतुकीची घनता लक्षात घेऊन सय्यदनगर येथील रेल्वे फाटक वाहतुकीसाठी खुले करा – खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी

हडपसर – सय्यदनगर फाटक क्र. ७ परिसरात बांधलेले अंडरपास वाहतुकीच्या दृष्टीने पुरेसे नसल्याने या भागातील वाहतुकीची घनता लक्षात घेऊन रेल्वे फाटक खुले करण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा यांच्याकडे केली आहे.

रेल्वे प्रशासनाने सय्यदनगर येथील फाटक क्र. ७ वरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून दोन अंडरपास बांधले असून अंडरपासचे काम पूर्ण होताच कोणतीही पूर्वसूचना न देता रेल्वे प्रशासनाने फाटक क्र. ७ वाहतुकीसाठी बंद करण्यात केले. मात्र ससाणे नगर, सय्यदनगर, हांडेवाडी रस्त्यावरील दररोज होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता फाटक खुले करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे यांनी पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा यांना पत्र पाठवून फाटक खुले करण्याची मागणी केली आहे. फाटक क्र. ७ वर पुणे महापालिकेकडून उड्डाणपूल अथवा अंडरपास बांधण्यात येणार असून भूसंपादन प्रलंबित असल्याने हे काम सुरू होण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने बांधलेले दोन्ही अंडरपास वाहतुकीच्या दृष्टीने पुरेसे नाहीत. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी या फाटकाच्या परिसरातील वाहतुकीची नव्याने पाहणी करण्याची सूचना डॉ. कोल्हे यांनी केली आहे.

तसेच या रस्त्यावरील वाहतुकीची घनता लक्षात घेऊन फाटक क्र. ७ वर उड्डाणपूल अथवा अंडरपास होईपर्यंत फाटक वाहतुकीसाठी खुले करण्यात यावे असे डॉ. कोल्हे यांनी पत्रात नमूद केले आहे. त्याचबरोबर येत्या २५ जानेवारी रोजी रेल्वेच्या महाप्रबंधकांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत हा विषय उपस्थित करणार असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले आहे.