हवेली

तुम्हाला आवडेल ते वाचा, वाचन हेच जीवन कौशल्याचे ज्ञान देईल -जावेद अख्तर यांचा सल्ला; एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद

हवेली प्रतिनिधी – अमन शेख

तंत्रज्ञानाच्या युगात साहित्य वाचन कौशल्य लुप्त होत चालले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाविषयी आवड निर्माण करणे आवश्यक आहे. विशेषत: नाटक, संगीत, कला, पत्रकारिता शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी वाचन कौशल्य जोपासावे. विद्यार्थ्यांनी त्यांना जे आवडेल त्या साहित्याचे वाचन करावे, तरच त्यांना जीवन कौशल्यांविषयीचे अनुभव व शिक्षण मिळेल, असा सल्ला प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी दिला.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ फिल्म आणि टेलिव्हिजन आणि एमआयटी आयएसबीजे यांच्यातर्फे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रा. अमित त्यागी, प्रा. कृष्णमुर्ती ठाकुर, डॉ. नचिकेत ठाकूर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
जावेद अख्तर म्हणाले, मला विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात नेहमीच आनंद होतो. त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही असते, विशेषतः त्यांचे प्रश्न मला नकल्पनासाठी मदत करतात. कला, साहित्य आणि इतर सर्वच क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे, मात्र सध्याची तरुण पिढी वाचनाकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. साहित्य वाचन केल्यास विद्यार्थ्यांना स्वत:चे मत विकतिस होण्यास मदत होईल. वाचनाकडे नैसर्गिक कल वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी हलक्या साहित्यांपासून सुरुवात करणे चांगली कल्पना आहे. यामुळे तुमचा शब्दसंग्रह वाढण्यास मदत होईल. शब्द हे मैत्रीसारखे असतात आणि ते आपण जपले पाहिजे.
दरम्यान, लेखक जावेद अख्तर यांनी त्यांच्या बॉलीवूडमधील प्रवासाविषयीचे त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर केले. तसेच कवितेला मूलत: गैर-काव्यात्मक संदर्भात जोपासण्याचा आनंद आणि संघर्ष यावर त्यांनी प्रकाश टाकला.

प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, की प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक श्री. जावेद अख्तर यांनी आमच्या फिल्म आणि टेलिव्हिजन आणि जर्नालिझमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील अनुभवातून शिकण्याची संधी दिली. आम्ही विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी आमच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो. यातून विद्यार्थ्यांना विविध कौशल्य शिकण्यास मदत होते.