पुणे

राज ठाकरे यांच्या भूमिकेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुण्यातील कोंढवा येथे निषेध आंदोलन

“गुढीपाडव्याच्या मनसेच्या मेळाव्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले. त्यानंतर सहाजिकच राज्यभर सामाजिक एकात्मता, शांतता भंग होईल असं वातावरण निर्माण झालेले असताना राज ठाकरे यांच्या भूमिकेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे शहरातील कोंढवा येथे निषेध आंदोलन घेण्यात आले.

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच आपला भारत देश विविध परंपरा, विविध संस्कृती, विविध भाषा, धर्म ,जात ,प्रांत या सर्व गोष्टींच्या कुठल्याही पर्वा न करता सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवत सर्व समाजातील लोक एकत्र नांदतात.

भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे प्रत्येक धर्माला प्रत्येक जातीला आपल्या आपल्या रितीरिवाजानुसार सण-उत्सव,प्रार्थना व धार्मिक कार्य करण्याचे स्वातंत्र्य आहे. गेल्या ७५ वर्षात अनेक वेळा काही जातीय कट्टरतावादी प्रवृत्तींनी ही शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला ,परंतु भारतीय नागरिकांनी त्यांना दाद दिली नाही. आज पुन्हा राज ठाकरे यांना पुढे करत समाजातील काही घटक अशाच प्रकारे हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण होईल व त्याचा राजकीय फायदा घेता येईल, असा विचार करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आयुष्यात आपण सर्वांनी लहानपणापासून हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन या सर्व समाजातील मित्रांसोबत राहत आपण लहानाचे मोठे झालो. अचानक आज कुणीतरी नेता येऊन म्हणतो की, या धर्माचा विरोध करा, त्या धर्माचा विरोध करा हे खरोखर सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे कृत्य असून,
या प्रवृत्तीचा आपण करू, तेवढा निषेध कमीच आहे. अशा प्रकारचे वातावरण हानीकारक असून भविष्यात आपण आपल्या पुढच्या पिढीला हे शिक्षण देणार आहोत का ….? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री प्रशांत जगताप यांनी केला.

आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री. प्रशांत जगताप, मा.नगरसेवक हाजी गफूर पठाण,प्रवक्ते प्रदीप देशमुख, मा.नगरसेविका नंदाताई लोणकर, हाजी फिरोज शेख, रईस सुंडके, मोहसिन शेख, डॉ.शंतनु जगदाळे, समीर शेख, दिपक कामठे, अब्दुल हाफिज, मेहबूब शेख, हसीना इनामदार यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.