हवेली

पोलीस आधिकारी असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतया पोलीसाला केले जेरबंद

हवेली तालुका प्रतिनिधी:-अमन शेख

दिनांक ११/०४/२०२२ रोजी गुन्हे शाखा युनिट-६ चे अधिकारी व अमलदार युनिट-६ च हद्दीमध्ये गस्त करित असताना त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एका इसमाने त्याच्याकडील स्विफ्ट कार विकण्याचा बहाणा करून पनवेल, नवी मुंबई येथील एक व्यक्ती आनंद पाटील यांची आर्थिक फसवणूक करून तेथून पळून गेला असून, तो सध्या आव्हाळवाडी, बाघोली, पुणे येथे रहाण्यास आलेला आहे अशी • खात्रीशीर बातमी मिळाल्याने, सदर बातमी श्री गणेश माने, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहर यांना माहिती दिली असता त्यांनी सदर ठिकाणी जावून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस पथक त्या ठिकाणी गेले असता त्यांना त्याठिकाणी एक लाल रंगाची स्विफ्ट कार मिळून आली, तिचा क्रमांक हा चुकीचा असल्याचे निष्पन्न झाले व त्या कारच्या डॅश बोर्डवर पोलीस अशी लिहलेली पाटी मिळून आली. त्या गाडी मालकास पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने “तुम्ही मला नाव विचारणारे कोण? मी पुणे पोलीस दलामध्ये ए.पी.आय. आहे” असे बोलून त्याने पोलीस पथका सोबत धक्का-बुक्की करून दमदाटी केली.

त्या नंतर त्याला गुन्हे शाखा युनिट ६ चे कार्यालयामध्ये आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता. त्याने त्याचे नाव सिध्देश्वर सुभाष नागरे वय ३३ वर्षे रा प्राईम कॉर्नर प्लॉट,९१, सेक्टर आर पुष्पकनगर, पनवेल, जि. रायगड असे सांगुन तो पोलीस दलामध्ये कार्यरत नसल्याचे त्याने सांगितले. तो राहण्यासाठी असलेल्या फ्लॅटच्या मालकाकडे चौकशी केली असता. त्यांनादेखील त्याला पोलीस असल्याचे सांगून भाडेकरू बाबत करारनामा केला नाही व त्यांना घरभाडे देखील दिलेले नाही, तसेच घराच्या शेजारील भाजी विक्रेत्यास देखील पोलीस असल्याचे सांगून त्याच्याकडून पैसे न देता भाजी घेवून गेल्याचे भाजी विक्रेत्याने सांगितले, तसेच त्याने पनवेल, नवी मुंबई येथे देखील दोन ते तीन जणांना पोलीस असल्याचे सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुध्द लोणीकंद पोलीस स्टेशन येथे फिर्याद देवून गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरची उलखणीय कामगिरी गुन्हे शाखा, युनिट-६ चे पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने, सहा पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र चाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे यांनी केली आहे.