पुणे

अरे बापरे …. ५ वर्षे जलतरण तलाव बंद ???? हडपसर येथील बंद तलाव वापरासाठी खुला होणार काँग्रेसच्या शिष्टमंडळाला आयुक्तांचे आश्वासन – प्रशांत सुरसे – अध्यक्ष, ओबीसी विभाग

पुणे – गेली पाच वर्षे बंद असलेला हडपसर येथील कै.रामचंद्र अप्पा बनकर क्रीडा संकुलातील जलतरण तलाव लोकांच्या वापरासाठी लवकरच खुला करण्यात येईल, असे ठोस आश्वासन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला शुक्रवारी दिले.

या क्रीडा संकुलातील जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल, व्यायाम शाळा आदी सुविधा लोकांसाठी खुल्या केल्या जाव्यात, अशा मागण्यांचे निवेदन पुणे शहर काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रशांत सुरसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले. आयुक्तांनी या निवेदनाची तातडीने दखल घेतली आणि जलतरण तलाव लोकांसाठी खुला करावा, देखभालीसाठी तातडीने निविदा मागवाव्यात अशा सूचना अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांना दिल्या.

यावेळी हडपसर विधानसभा काँगेस कमिटीचे अध्यक्ष प्रा शोएब इनामदार, पल्लवी सुरसे, नंदकुमार अजोतिकर आदी उपस्थित होते

महापालिकेने हडपसर येथे कै.रामचंद्र अप्पा बनकर क्रीडा संकुल उभे केले. मा.खा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते दिनांक २६ डिसेंबर २०१६ रोजी क्रीडा संकुलाचे लोकार्पण करण्यात आले. संकुलात आर.आर.पाटील जलतरण तलाव, स्वर्गीय विलु पूनावाला बॅडमिंटन हॉल आणि व्यायामशाळा आदी सुविधा आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला हा प्रकल्प पाच वर्षे बंदच ठेवण्यात आलेला आहे. प्रकल्प बंद असतानाही देखभालीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. जलतरण तलाव पाच वर्षात एकदाही सुरू नसताना त्याच्या देखभालीसाठी ३० लाख रुपये खर्च करण्यात आले. महापालिकेच्या पैशाचा हा अपव्यय आहे, त्याला जबाबदार कोण?
गेल्या पाच वर्षांमध्ये या क्रीडा संकुलामध्ये अनेक विद्यार्थी युवक-युवती महिला व जेष्ठ नागरिक हे या सोयी सुविधापासुन वंचित राहिले .
जनतेचा कर रुपी पैशातून बांधलेला हा प्रकल्प जनतेसाठी सुरु न केल्याने तरुण पिढीचे नुकसान कोण भरून देणार? याला जबाबदार कोण? असा सवाल प्रशांत सुरसे यांनी निवेदनात केला आहे.

जलतरण तलावाचा वापर सुरू झाल्यास अनेक जलतरणपटू येथे निर्माण होऊ शकतील याकरिता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला आहे. वेळप्रसंगी लोकांच्या मागणीसाठी काँग्रेस पक्ष आंदोलनही करेल, असा इशारा प्रशांत सुरसे यांनी निवेदनात दिला आहे.