पुणे

अनिल गुंजाळ यांचे शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य निश्चितच कौतुकास्पद – आ. विक्रम काळे

अनिल गुंजाळ यांचे शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य निश्चितच कौतुकास्पद – आ. विक्रम काळे

पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना व पुणे माध्यमिक शाळा शिक्षकेतर सहकारी पतपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने अनिल गुंजाळ – मा. सहा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे, यांचा सेवापुर्ती समारंभाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला . या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार मा. श्री. विक्रम काळे व या समारंभाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री लक्ष्मीकांत देशमुख, माजी सनदी अधिकारी व माजी मराठी संमेलनाचे अध्यक्ष, यांचे शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी येथील मा. श्री. विजय बोरसे (ओ. एस. डी. – शिक्षण राज्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई)  अनिल माने, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ व  शिवाजी खांडेकर – राज्य सरकार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ, पुणे माध्यमिक शिक्षकेतर सहकारी पतपेढीचे अध्यक्ष श्री. प्रसन्न कोतुळकर, सचिव  देवेंद्र पारखे, पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष सुखदेव कंद, कार्याध्यक्ष  संजय धुमाळ, उपाध्यक्ष विनोद गोरे, अनेक शाळांचे आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक व मोठ्या संख्येने शिक्षकेतर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शिक्षक आमदार श्री विक्रम काळे यांनी अनिल गुंजाळ यांचे शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे असे सांगितले. शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असतांनाही त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली ज्यामुळे खुप सार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी संधी मिळाली. विशेषता परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यास अडचण असणारे विद्यार्थी, त्याच बरोबर इयत्ता दहावी – बारावी परीक्षेमध्ये अपयशी ठरलेले विद्यार्थ्यांना त्यांनी सतत मार्गदर्शन केले ज्यामुळे त्यातील अनेक विद्यार्थी आज देखील विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. यातील कित्येक विद्यार्थ्यांना ते प्रत्यक्ष भेटली देखील नाहीत परंतु फोन वरून त्यांचे समुपदेशन करून त्यांनी त्या विद्यार्थ्यांचे जीवन सार्थकी लावण्याचा प्रयत्न केला. आपल्या शासकीय कामावर त्यांची नितांत श्रद्धा होती. शासकीय काम करत असतानाच त्यांनी आपल्या मनात असलेली साहित्य व कला याकडे देखील अत्यंत आवडीने लक्ष दिले. लेखन, वाचन कविता सादरीकरण, निवेदन आपल्या आवडी त्यांनी जोपासल्या. शिक्षकेतर संघटना व शिक्षकेतर पतपेढी यांनी देखील त्यांच्या या सर्व शैक्षणिक सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन हा सुंदर कार्यक्रम आज घेतला त्याबद्दल त्यांचे देखील मनःपूर्वक आभार व कौतुक विक्रम काळे यांनी केले.

ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख माजी सनदी अधिकारी व माजी अध्यक्ष मराठी साहित्य संमेलन यांनीदेखील याप्रसंगी श्री व सौ गुंजाळ यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्याचबरोबर शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून श्री. गुंजाळ यांनी त्यांच्या जोपासलेल्या साहित्य व कला क्षेत्रातील कार्याबद्दल अत्यंत आनंद व्यक्त केला. शिक्षण क्षेत्रातील प्रगतीसाठी अनिल गुंजाळ यांच्यासारखे अधिकारी असणे आवश्यक आहे असेदेखील श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी नमूद केले.
श्री शिवाजी खांडेकर यांनी श्री गुंजाळ साहेब यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचा काम करत असतानाचा सकारात्मक दृष्टिकोन, नेहमीच विद्यार्थी हित समोर ठेवून त्यांनी केलेले मार्गदर्शन आम्हा सर्वांना कायम आठवणीत राहील, सतत प्रेरणा देत राहील असे सांगितले.

 विजय बोरसे, अनिल माने, श्री कानडे सर इत्यादी अनेकांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी पुणे माध्यमिक शाळा शिक्षकेतर पतपेढीचे अध्यक्ष  प्रसन्न कोतुळकर यांनी सर्वांचे आभार मानले.