मुंबई

‘मोठी बातमी – “माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच, शिवसेना उपनेतेपदी कायम – शिवसेनेचे स्पष्टीकरण”

मुंबई: अवघ्या काही तासांपूर्वी शिवसेनेकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईला स्थगिती देण्यात आलेली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपांखाली आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांचे उपनेतेपद काढून घेण्यात आले होते. मात्र, आता हा आदेश मागे घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेकडून (Shivsena) यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. आज दिनांक ३ जुलै २०२२ रोजी सामना दैनिकामध्ये मध्ये छापून आलेली बातमी अनावधानाने छापून आलेली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेमध्येच कार्यरत आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यलयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे. त्यामुळे हा आदेश नेमका कोणाकडून काढण्यात आला होता, याविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आढळराव पाटील यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात होते. आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देणारे ट्विट केले होते. ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असे या ट्विटमध्ये म्हटले होते. हेच ट्विट आढळराव पाटील यांच्यावरील कारवाईस कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात होते. मात्र, अवघ्या काही तासांमध्ये या आदेशात तथ्य नसल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा सगळा प्रकार नक्की कोणत्या गैरसमजातून किंवा अन्य कारणाने घडला, याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत.

नेमका वाद काय?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत ३९ आमदारांची मोट बांधली आणि बंडाचा झेंडा हाती घेतला. परिणामी उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात आलं आणि ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. या बंडखोर शिवसेना आमदारांच्या आणि भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशातच एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करणारे पोस्टर्स लावले जात आहे. तसंच सोशल मीडियावरूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मात्र पक्षप्रमुखांचा फोटो न वापरता बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्यानंतर आणि त्यांचे समर्थन केल्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगितले जात होते.

एकनाथ शिंदे यांची नेतेपदावरून हकालपट्टी

पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंविरोधात पक्षानं मोठी कारवाई केली होती. कनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षविरोधी कारवाई केल्याचा उल्लेख शिवसेनेनं शिंदेंना पाठवण्यात आलेल्या पत्रात करण्यात आला होता.