बारामती

“..म्हणून फक्त मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी”, बारामतीत अजित पवारांची टोलेबाजी!

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, तेव्हापासून मंत्रीमंडळ विस्तार नेमका कधी होणार? त्यामध्ये कुणाकुणाला संधी मिळणार? शिंदे गट आणि भाजपामध्ये मंत्रीपदांची वाटणी कशी होणार? यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. मात्र, अद्याप सरकारकडून मंत्रीमंडळ विस्ताराविषयी स्पष्ट भूमिका मांडली जात नव्हती. आज दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीनंतर मंत्रीमंडळ विस्ताराविषयी चर्चा केली जाणार असल्याचं सांगितलं. मात्र, यासंदर्भात विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खोचक टीका करताना तुफान टोलेबाजी केली आहे. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीसांना टोला!

आपल्या भाषणात अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. “सुरुवातीच्या काळात अनेकजण म्हणाले की आमचा या घटनांशी दुरान्वयानेही संबंध नाही. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. पण नंतर एका नेत्याच्या पत्नीनंच सांगितलं की माझा नवरा रात्री वेशभूषा बदलून अनेकदा इतरांना भेटायला जायचे. हे मी म्हणत नाही. एकीकडे तुम्ही सांगता की आमचा संबंध नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा गोष्टी घडत नव्हत्या. साम-दाम-दंड-नीतीचा अवलंब करून यातून मार्ग काढण्याचं ध्येय समोर ठेवून या गोष्टी केल्या गेल्या. त्यातून बंड झालं”, असं अजिच पवार म्हणाले.

“शिंदे-फडणवीसांच्या मनात धाकधूक”

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनात धाकधूक असल्यामुळेच त्यांनी फक्त स्वत:चाच शपथविधी करून घेतल्याचं अजित पवार म्हणाले. “कुठेतरी आत्ताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मनात धाकधूक असल्यामुळे त्यांनी स्वत:चा शपथविधी केला. पण इतर मंत्रीमंडळ विस्तार केला नाही. ११ तारखेनंतर विस्तार करू असं म्हणाले आहेत. कुठेतरी पक्षांतरबंदीच्या संदर्भात ज्या गोष्टी मधल्या काळात घडल्या किंवा इतर राज्यात अशा घटना घडल्या, तेव्हा काय निकाल लागले याकडे पाहाता येईल”, असं अजित पवार म्हणाले.

“कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही”

यावेळी बोलताना अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. “कुणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते. ६७ सालापासून शरद पवार राजकारणात आहेत. आपण सगळ्यांनी चढउतार पाहिले आहेत. मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद पाहिलं आहे. मंत्रीपद, राज्यमंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद पाहिलं आहे. आजही विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आपण व्यवस्थितपणे पार पाडू. विरोधाला विरोध करण्याची भूमिका माझी नसते. पण कुणी चुकत असेल, तर ती चूक सांगितली गेली पाहिजे”, असं अजित पवारांनी यावेळी नमूद केलं.

“आमदारांची चांगली ट्रीप झाली”

अजित पवारांनी बंडखोर आमदारांना देखील यावेळी टोला लगावला. “शिवसेनेचे आमदार फुटल्यामुळे सरकार अल्पमतात आलं. दुसऱ्या दिवशी बहुमत चाचणी होती, तेव्हा उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं की ते आमदार आपल्यासोबत नाहीत. आमदारांचीही चांगली ट्रीप झाली. सूरत बघितलं, गुवाहाटी बघितलं, गोवा बघितलं. बरंच काय काय झालं. पण नंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं ठरवलं होतं की उद्धव ठाकरेंच्या पाठिशी शेवटपर्यंत राहायचं. त्याप्रमाणे आपण त्यांच्या पाठिशी राहिलो”, असं अजित पवार म्हणाले.

“..तेव्हा एकनाथ शिंदेंनी स्वत: राजीनामा सादर केला होता”

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात देखील यातले शिवसेनेचे काही मंत्री खिशात राजीनामा घेऊन फिरत होते, असा टोला अजित पवारांनी यावेळी लगावला. “काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल ते म्हणाले की हे निधी देत नव्हते. पण मी तुम्हाला सांगतो, की मागच्या टर्मला जेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं, तेव्हा त्यांनी मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून फक्त १२ लोकांना संधी दिली होती. खातीही साधी दिली होती. ५ मंत्री आणि ७ राज्यमंत्री. ठाण्याच्या सभेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी राजीनामा सादर केला होता. ते म्हणाले होते, की भाजपाच्या सरकारमध्ये आम्हाला मान-सन्मान मिळत नाही. दिवाकर रावते म्हणायचे की राजीनामे आम्ही खिशात घेऊन फिरतो. त्यांना जशी वागणूक मिळाली, त्याबाबत ते नकारात्मक बाबी बोलून दाखवायचे”, असं अजित पवार म्हणाले.