पुणे

“चोरट्यांनी घातला धुमाकूळ – वानवडी भागातील एकाच सोसायटीतील ११ सदनिका चोरट्यांनी फोडल्या”

शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून वानवडी भागातील एकाच सोसायटीतील ११ सदनिका चोरट्यांनी फोडल्या. ओैंध भागात एका सोसायटीतील सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी परदेशी बनावटीचे घड्याळ, सोन्याचे नाणे, परदेशी चलन असा ऐवज लांबविल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत शैलेश बाफना (वय ४०, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी ) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाफना यांची परमारनगर को-ऑप सोसायटीत सदनिका आहे. चोरट्यांनी बाफना यांच्या सदनिकेचे कुलुप तोडले तसेच अनिल शहा, रेहान शेख, सचिन दळवी, गीता जाम, फक्रुद्दीन फुरवाला, विजया जाधव यांच्या बंद सदनिकांचे कुलुप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. शेजारी असलेल्या एका सोसायटीतील तीन बंद सदनिकांचा दरवाजा उचकटण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले तपास करत आहेत.

ओैंधमधील नागरस रस्त्यावरील हर्ष विहार सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी परदेशी बनावटीचा कॅमेरा, घड्याळ, सोन्याचे नाणे, परदेशी चलन असा एक लाख ७१ हजारांचा ऐवज लांबविला. याबाबत गौरव साठे (वय ४२) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक बी. आर. झरेकर तपास करत आहेत.

मोबाइल विक्रीचे दुकान फोडून मोबाइळ संच व रोकड लांबविली –

बिबवेवाडी भागात सुखसागर नगर परिसरातील मोबाइल विक्री दुकानाचे कुलुप तोडून चोरट्यांनी २५ मोबाइल संच, गल्ल्यातील १९ हजार ६०० रुपये असा एक लाख ९४ हजारांचा मुद्देमाल लांबविला. याबाबत प्रदीप दळवी (वय ३८, रा. टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दळवी यांचे सुखसागरनगर परिसरात समर्थ मोबाइल दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून २५ मोबाइल संच आणि गल्ल्यातील रोकड लांबविली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.