पुणे

“शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडील प्रकल्पांना गती – खा. अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश”

पुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडील प्रकल्पांना गती मिळाली असून नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्त करण्यात आला असून येत्या काही दिवसांत पुणे शिरूर आणि तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित राहिलेले नाशिक फाटा ते चांडोली, वाघोली – शिरूर आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गांचे प्रकल्प लवकर मार्गी लागावेत यासाठी आज खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली.

या बैठकीत शिरुर लोकसभा मतदारसंघातील सर्वच महामार्गाच्या कामांबाबत चर्चा करताना खासदार डॉ. कोल्हे यांनी या महामार्गांची झालेली दुरावस्था आणि वाहतूक कोंडी यामुळे जनतेत प्रचंड नाराजी असल्याचे केंद्रीयमंत्री गडकरी यांच्या निदर्शनास आणत हे सर्व प्रकल्प लवकर सुरू व्हावेत अशी मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद केंद्रीयमंत्री गडकरी यांनी नाशिकफाटा ते चांडोली या लांबीतील एलिव्हेटेड रस्त्याच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (Project Management Consultancy) संस्थेची नियुक्ती करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर पुणे अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाघोली ते शिरुर दरम्यान आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या दोन्ही महामार्गावर एलिव्हेटेड रस्ता बांधण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्त करण्यासाठी येत्या काही दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येतील असेही केंद्रीयमंत्री गडकरी यांनी सांगितले.

या व्यतिरिक्त नारायणगाव बायपास रस्त्यावरील खोडद येथील अंडरपासच्या कामाला मंजुरी मिळण्यास होत असलेल्या विलंबाचा प्रश्न खासदार डॉ. कोल्हे यांनी या बैठकीत मांडला. त्यावर खोडद जंक्शनचं काम “अॅक्सिडेंट झोन इम्प्रूव्हमेंट” मध्ये समाविष्ट केले असल्याचे सांगून हे कामही लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

यंदाच्या पावसाळ्यात शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गांवर खड्डे पडल्यानंतर वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली होती. अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. या प्रकारांची दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी संसद अधिवेशनाची संधी साधून आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नी केंद्रीयमंत्री गडकरी यांना बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत गडकरी यांनी आज बैठक आयोजित केली होती. या बैठकीत खासदार डॉ. कोल्हे यांनी गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत आपल्या मतदारसंघातील सर्वच कामांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल खासदार डॉ. कोल्हे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.