पुणे

साधनातील विद्यार्थ्यांनी घेतले पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचे धडे 

हडपसर,वार्ताहार. ” गणेशोत्सव साजरा करतांना बऱ्याच प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेली गणेशमूर्ती वापरली जाते.या प्रकारच्या मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित केल्यावर त्यांचे लगेच विघटन होत नाही, त्यामुळे पाणी प्रदूषित होते. यावर उपाय म्हणून शाडूच्या मातीपासून बनविलेली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती वापरणे ही काळाची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी असे पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे गरजेचे आहे,” असे मत साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेजचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्डाचे सचिव प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी मांडले.
साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेज,हडपसर मधील राष्ट्रीय हरित सेना योजनेमार्फत शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतान ते बोलत होते.
या उपक्रमाचे आयोजन साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, पर्यवेक्षक दिलीप क्षीरसागर, शिवाजी मोहिते यांनी केले होते. या कार्यशाळेस खेड तालुका पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विज्ञान विभाग प्रमुख धनाजी सावंत, राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख शैलेश बोरुडे, साधना खोत,नितेश मुजुमले, सविता माने यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना, “शाडूच्या मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्तीच पर्यावरणपूरक असतात.अशा गणेशमूर्ती पाण्यात बुडविल्यावर त्यांचे विघटन लवकर होते व नदीचे पाणी ही अस्वच्छ होत नाही व पाणी प्रदूषित होत नाही.प्रत्येकाने आपल्या निसर्गाचा व पर्यावरणाचा विचार करून त्यांच्या संवर्धनासाठी शाडूच्या मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्तीच वापरणे गरजेचे आहे, तसेच प्रत्येकाने कोणताही सण-उत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक पध्दतीने साजरा करणे महत्त्वाचे आहे,”असे मत राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख शैलेश बोरुडे यांनी मांडले.
या कार्यशाळेत साधना विद्यालयातील शिक्षक शैलेश बोरुडे, साधना खोत यांनी प्रत्यक्ष शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती कशी तयार करतात याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविले.त्यानंतर कार्यशाळेत सहभागी असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने गणेशमूर्ती तयार केल्या. अशा एकूण ५० गणेशमूर्ती कार्यशाळेत तयार करण्यात आल्या. या बनविलेल्या गणेशमूर्तीची घरात प्राणप्रतिष्ठा करून पर्यावरणचे संवर्धन करण्याचा निश्चय व समाजामध्ये पर्यावरणपूरक विषयी जनजागृती करण्याचा संकल्प सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी केला.