पुणे

विद्यार्थ्यांनी निवडलेल्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे -उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे दि.२४: देशाने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. देशाच्या प्रगतीसाठी युवकांचे योगदान महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी शिक्षणानंतर निवडलेल्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

मिमा मिटकॉन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट व्यवस्थापन शिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मिटकॉनचे अध्यक्ष संचालक प्रदीप बावडेकर,कार्यकारी उपाध्यक्ष सुरेश घोरपडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अदित्या बावडेकर, जोशी, अमोल वालवटकर, श्रीमती ज्योती कळमकर आदी उपस्थित होते.

श्री पाटील म्हणाले, मिटकॉनमध्ये राज्यासह देशातील इतर भागातील विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत, ही अभिमानाची बाब आहे.आपण ज्या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत, त्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे. जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. जगभरात भारताची वेगळी ओळख निर्माण झाली असून शिक्षण तसेच उद्योग क्षेत्राला पाठबळ देण्यात येत आहे.

नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षणाचा व्यवहारात उपयोग होईल अशा बाबींचा आंतर्भाव करण्यात आला आहे. कोरोना कालावधीत आलेल्या अडचणीनंतर देश औषधांच्या बाबतीत स्वंयपूर्ण होत आहे. महिलांचेही प्रत्येक क्षेत्रात मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

मिटकॉन संस्थेत पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी श्री. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.