पुणे

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आयोजित सन्मान नवदुर्गांचा या अभियानात भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा सन्मान

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला भगिनींचा “सन्मान नवदुर्गांचा २०२२” या अभियानाअंतर्गत त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान करण्यात येत आहे. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या निवासस्थानी बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुषमा सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रतिभाताई पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी सुनेत्रावहिनी पवार यांनी प्रतिभाताई पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. प्रतिभाताईंनी देखील आदरणीय पवार साहेब व अजितदादा यांच्या समवेत त्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्त्रियांचा सन्मान करणे, त्यांना विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन देणे हे आपल्या मराठी मातीचे संस्कार आहेत. नवरात्रीचा हा उत्सव आदिशक्तीच्या जागर करण्याचा उत्सव असतो. या उत्सव काळात देव-देवतांमधील दुर्गा सोबतच समाजात विविध क्षेत्रांमध्ये आपल्या आलौकीक कामगिरीतून नाव कमविलेल्या महिला भगिनी देखील आम्हाला दुर्गे इतक्यात वंदनीय आहेत. या महिलांचा मान सन्मान व्हावा या हेतूने पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसने या स्तुत्य उपक्रम आयोजन केले आहे.
 प्रतिभाताई पाटील यांनी या पुरस्काराचा स्वीकार करत राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे सर्व टीमचे कौतुक केले. या सन्मान सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक महेंद्र पठारे,पुणे शहर उपाध्यक्ष संदीप बालवडकर, दिपक कामठे आदींसह मोठ्या संख्येत पदाधिकारी उपस्थित होते.