पुणे

“महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांची आज जयंती”

आज महाराष्ट्रातील एकात्मतेची पताका पंजाब पर्यंत नेणारे संत शिरोमणी नामदेव यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन.

देशातील काही राज्यात आजही सीमावाद चालू असल्याचे आपण पहात आहोत, परंतु संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी त्या काळातही राज्याराज्यातील एकोपा जपल्याचे आढळून येते ते त्यांनी सांधलेला एकोपा म्हणून पंजाब, राजस्थान आदी राज्यातही शीख बांधवांनीही नामदेवाची महाराजांची मंदिरे उभारलेली आहेत.

कार्तिक शु ११ म्हणजे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा नरसी बामणी जि. हिंगोली येथे जन्म म्हणून नरसीला नरसी नामदेवांची म्हणून ओळखल्या जाते.

शिखांचे गुरू ग्रंथसाहिबातले  चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म  पंजाबपर्यंत नेणारे संत नामदेव महाराज हे आद्य प्रचारक होते. त्यामुळे पंजाबी मंडळी आजही त्यांच्या नरसी नामदेवांच्या गावाच्या विकास करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत.

संत नामदेव महाराज महाराष्ट्रातील  वारकरी संतकवी होते. त्यांनी  व्रज  भाषांमध्येही काव्ये रचली. संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग “नामदेवजीकी मुखबानी” शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत.

आजच्या परिस्थिती मध्ये समाज संतांना आपापल्या जाती मध्ये गोवत असताना संत नामदेवांनी मात्र भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. याची जाणीव आपण ठेवायला हवी असे मनोमन वाटते.

पंजाबमधील शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे.

बहोरदास, लढ्विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी’ असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते. खरं तर संत नामदेव महाराज हे एकमेव कीर्तनेकार होते ज्यांनी संपूर्ण भारतभर किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले.

कलियुगीं जन मूर्ख शून्यवृत्ति । तारिसी श्रीपति नाम घेतां ॥१॥
परम पावना पवित्रा निर्मळा । भक्ताचा सांभाळ करीं देवा ||२||

कृपा करोनि त्वां मज प्रसना व्हावें । आणि म्यां मागावें बुद्धिज्ञान ॥१॥ ऐसी भुली मज न घालीं पांडुरंगा । बिघड संत्संगा न करीं मज ॥२॥

एक भक्त
सुधीर उध्दवराव मेथेकर