पुणे

खऱ्या अर्थाने कुटुंबप्रमुख.. चंद्रकांतदादांनी घेतले दोन अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व!

पुणे,दि.- राजकारणाचा स्तर आणि राजकीय वारे बेबंद दिशेने वाहत असलेल्या आजच्या जमान्यात आपली सामाजिक जबाबदारी आणि संवेदनशीलता जतन करणाऱ्या राजकीय नेत्यांमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांचे नाव घ्यावे लागेल.याचा प्रत्यय पुण्यात घडलेल्या एका घटनेने आला.आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या लेकरांच्या पालनपोषणासाठी कष्ट उपसणाऱ्या आजीवरही अर्धांगवायूच्या झटक्याने घाला घातला.आता ती लेकरे पुन्हा उघड्यावर पडणार असे वाटत असतानाच चंद्रकांतदादा एका कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेत पुढे सरसावले आणि त्या लेकरांच्या शैक्षणिक पालकत्त्वाची जबाबदारी उत्स्फूर्तपणे स्वतः घेतली.
मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार होवून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी चळवळीतून एक सच्चा संवेदनशील कार्यकर्ता म्हणून चंद्रकांतदादा नावारुपास आले.पुढे भारतीय जनता पक्षाचा वरच्या फळीतील नेता म्हणून कार्यरत राहताना त्यांनी आपली सामाजिक संवेदनशीलता कधी ढळू दिली नाही.किंबहुणा संधी मिळेल तिथे आपल्या त्या संवेदनशीलतेला प्रामाणिक कृतीची जोड दिली.त्यातलेच एक उदाहरण म्हणजे ही घटना!विशेष म्हणजे एखाद्याला केलेल्या मदतीची कुठे वाच्यता करायची नाही, ही त्यांची आपल्या सहकाऱ्यांना प्रामुख्याने सूचना असते. याचाच एक प्रत्यय कोथरुडकवासियांना नव्याने मिळाला, कारण केवळ शासकीय पालकमंत्री न राहता त्यांनी दोन अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेत खऱ्याखुऱ्या कुटुंबप्रमुखाची जबाबदारी पार पाडली.
कोथरुडमधील केळेवाडी परिसरातील ओंकार आणि तेजश्री पवार ही दोन हुशार आणि जिद्दी मुले , जी शिक्षणासाठी अतिशय खडतर परिश्रम घेत आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असूनही देखील आव्हानांचा सामोरे जात शिक्षणासाठी धडपडत करत असतानाच या दोघांवर काही दिवसांपूर्वीच दुःखाचा डोंगर कोसळला. या दोघांचे आई-वडिलांचे छत्र हरपले. क्षणातच होत्याचे नव्हते झाले.अशा परिस्थितीत त्या लेकरांना त्यांची आजी रेखा शिंदे यांचा आधार मिळाला. आजीने देखील मोठ्या जिद्दीने या दोन्ही नातवांचा उदरनिर्वाहाचा तसेच शिक्षणाचा भार उचलला. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.काही दिवसातच आजी रेखा शिंदे यांना अर्धांगवायूचा तीव्र धक्का बसला आणि त्या अंथरुणाला खिळल्या. दोनही भाऊ-बहिणींसाठी हा एक मोठा मानसिक आघात होता. आर्थिक उत्पन्नच थांबले होते, संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती करायचं काय ? आणि पुढील शिक्षण ? असे अनेक प्रश्न बहीण भावांच्या मनात काहूर माजवत होते.या पार्श्वभूमीवर आपल्याला आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडून निश्चितच मदत होईल या विश्वासाने दोघाही भाऊ-बहिणींनी एक दिवस कोथरुडचे आमदार आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपली व्यथा चंद्रकांतदादां समोर मांडली. क्षणाचाही विलंब न करता दादांनी या दोनही मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आणि दोनही मुलांच्या उत्तम शिक्षणासाठी आणि भविष्यासाठीची सामाजिक जवाबदारी कर्तव्य म्हणून पार पाडली व पुन्हा एकदा दादांमधील खऱ्या अर्थाने पालक असणारा कुटुंब प्रमुख पाहायला मिळाला.