पुणे

“सिनेट मतदारांना पांडे हवेत की जगताप…? ” , युवासेनेचे कुलदीप आंबेकर यांचा पुणे विद्यापीठाच्या सिनेट मतदारांना सवाल.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीबाबत महविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना या घटक पक्षांनी पुण्यात संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

सिनेट निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी अतिशय मनमानी पद्धतीने व राजकीय हेतुने प्रेरित होत मतदान केंद्रांची व निवडणूक प्रक्रियेची रचना केली, परंतु तरी देखील महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरली असून, आज झालेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी विकास पॅनलच्या उमेदवारांना काही सवाल राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या वतीने विचारण्यात आले आहेत यात प्रामुख्याने, महाराष्ट्राच्या बाहेर व परदेशात संशोधन केंद्रे सुरू का नाहीत..?, यूजीसी विद्यापीठ अनुदान आयोगाचे प्रादेशिक केंद्र बंद का..?, प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य व भांडी विद्यापीठाच्या निधीतून घेतली त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी विचारणा का केली नाही? , प्रभारी कार्यकाळात कुलगुरू यांनी अनेक परदेश दौरे केले, त्याला त्याच वेळी मज्जाव का केला नाही …?,
कार्यकाळ संपून देखील विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या उद्घाटनास सर्व सिनेट कोणत्या आधारावर उपस्थित राहिले..? , प्लेसमेंटसाठी ३४ लाख रुपये खर्च करूनही नाममात्र विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला मग ३४ लाख खर्च कुठे झाले..? , पदव्युत्तर व पी.एच.डी. शुल्कात दुप्पट वाढ करण्यात आली, ही दरवाढ थांबवली का नाही…?, विद्यापीठात कुलगुरूंचा निरोप समारंभानिमित्त आयोजित केलेल्या संगीत मैफिल कार्यक्रमावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला, या कार्यक्रमात विद्यार्थी हिताचे असे काय होते…? , विद्यापीठातील मुख्य इमारतीस लोखंडी गेट बसवण्यासाठी दोन कोटी खर्च करण्यात आले, मात्र महानगरपालिकेने हेरीटेज असल्याने हे काम थांबवले , पण त्यासाठी महानगरपालिकेची अगोदरच परवानगी का घेतली नाही..?

पत्रकारितेसाठी देशातील नामवंत असे
रानडे इन्स्टिट्यूट बंद पाडण्याचा डाव का घालण्यात आला…? रानडे इन्स्टिट्यूटची जागा हडप करून तेथे मॉल करण्याचा प्रस्ताव सिनेटच्या सत्ताधारी सदस्यांना मान्य आहे का….?, विद्यापीठ परिसरात जॉगिंग करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांकडून ऑक्सीपार्क च्या नावाखाली महिना एक हजार रुपये घेण्याचा चुकीचा निर्णय का घेण्यात आला..?, गुणवत्ता सुधार योजनेतील १४१कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी फक्त ७६ कोटी रुपये खर्च करण्यात आले, सी.एस.आर निधीतून विद्यापीठ आवारासाठी दोन बस मिळाल्या मात्र मागील दहा वर्षात त्या देखील गायब झाल्या, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत (२०१५ – २०१९) प्राप्त निधीच्या अडीच कोटी रुपयांपैकी एक रुपया देखील खर्च करण्यात आला नाही, स्वच्छ वारी निर्मळ निर्मल वारी २०१९ मध्ये जागतिक विक्रम करण्यात आला होता यात ३ कोटी ४० लाख रुपये खर्च झाला, त्यातील ०२ कोटी ७५ लाखांचा हिशोबच प्रायोजकांनी दिला नाही..? या सर्व गैरकारभारात सत्ताधाऱ्यांनी कुठेही विद्यार्थी हिताचा विचार केला नाही, असा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे.
हा सगळा गैरकारभार होत असताना याबाबत परस्पर दुर्लक्ष करणारे सत्ताधारी हे देखील या गैरकारभारात सहभागी आहेत का…? याचे उत्तर त्यांनी द्यावे. गेल्या काही काळातील गलथान कारभारानंतर देखील पुन्हा निवडून येण्यासाठी नगर जिल्ह्यातील मतदारांचे मतदान नाशिक जिल्ह्यात टाकण्यात आले, नाशिकचे मतदान पुण्यात टाकण्यात आले व पुण्यातले काही मतदान नगर व नाशिक मध्ये टाकण्यात आले, अशा प्रकारे मतदारांना त्यांच्या घरापासून जास्त लांब मतदान केंद्र देत त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा हा डाव असून या डावाच्या विरोधात महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनीशी लढणार असून या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, युवा सेनेचे राजेश पळसकर, कुलदीप आंबेकर, संदीप बालवडकर, सुषमा सातपुते, किशोर कांबळे, महेश हांडे, शिल्पा भोसले, डॉ.सुनिता मोरे, दिपक कामठे, विक्रम जाधव व प्रगती पॅनल मधील सर्व उमेदवार तसेच पदाधिकारी उपस्थित होते.