पुणे

राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सांगलीमध्ये सुवर्ण महोत्सवी अधिवेशन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ यांचे ५०वे सुवर्ण महोत्सवी राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्र रविवार दिनांक ०८/०१/२०२३ रोजी सांगली येथे संपन्न होणार आहे. धनंजय गार्डन सांगली येथील या अधिवेशनास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाची उद्घाटन होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी दिली. याप्रसंगी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आवश्यक असणारे व शासन दरबारी प्रलंबित असणाऱ्या अनेक प्रश्नांची चर्चा व माहिती या अधिवेशनानिमित्त होणार आहे असे श्री शिवाजी खांडेकर यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षापासून माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक प्रश्न प्रलंबित असून याबाबत या अधिवेशनामध्ये विचारविनिमय करण्यात येणार आहे. शिक्षकेतरांची चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसह पदांची भरती सुरू करण्यात यावी, प्रलंबित अनुकंपा नियुक्त्या, शिक्षकेतरांना देखील २४ वर्षानंतर दुसरा लाभ मिळणे बाबत, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०/२०/३० च्या लाभाची योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ लागू करण्याबाबत, शिक्षकेतरांनी शैक्षणिक पात्रता वाढविल्यास त्यांना सर्व प्रकारच्या पदांवर वेतन संरक्षणासह विनाअट संवर्ग बदलून मिळावा, विद्यार्थी संख्या अभावी शिक्षकेतरांच्या वेतन व वेतनश्रेणीस संरक्षण मिळावे, माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अर्जित रजा साठवणे संदर्भात कमाल मर्यादा काढून टाकण्यात यावी, शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील कॅशलेस वैद्यकीय सुविधा लागू करावी इ. मागण्या बाबत या अधिवेशनात त चर्चा करण्यात येणार आहे. तरी पुणे जिल्ह्यातील जास्त जास्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ च्या अधिवेशन व चर्चासत्रास उपस्थित राहावे असे आवाहन पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष श्री विनोद गोरे व जिल्हा कार्याध्यक्ष श्री प्रसन्न कोतुळकर यांनी केले आहे.