पुणे

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अथक प्रयत्नांनी, पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, थेऊर फाटा, व उरुळी कांचन, येथे अंडरपास रस्त्याच्या कामाला मंजुरी,

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

लोणी काळभोर (पुणे) : पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन, थेऊर फाटा व उरुळी कांचन (ता. हवेली) येथील चौकांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अंडरपास रस्त्याच्या कामाला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. तर चौकांमध्ये अंडरपास रस्ता होणार असल्यामुळे पूर्व हवेलीतील नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पुणे सोलापूर महामार्गावर सतत अपघात होत होते. या
अपघातांमध्ये काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. काही नागरिकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले होते. या महामार्गावरील सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी खासदार कोल्हे यांच्याकडे वारंवार मागणी केली होती.
सदर मागणीची खासदार डॉ. कोल्हे यांनी दखल घेत हडपसर ते उरळीकांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्याची मागणी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. मात्र, त्यासाठी बराच विलंब लागणार असल्याने खासदार डॉ. कोल्हे यांनी किमान महत्वाची जंक्शन सुरक्षित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सूचना दिल्या होत्या.

त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खासदार डॉ. कोल्हे यांच्या केलेल्या सूचनांची दखल घेऊन अखेर लोणी स्टेशन, थेऊर फाटा आणि उरुळी कांचन येथे अंडरपास रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली. त्यानुसार उरळीकांचन (कि.मी.२८/९१०), लोणी काळभोर (कि.मी. १७/५००) आणि थेऊर फाटा (कि.मी. २०/२८०) या ठिकाणी अंडरपास बांधण्याच्या कामाला मंजुरी दिली.
पूर्व हवेलीतील लोणी स्टेशन, थेऊर फाटा आणि उरुळी कांचन येथे अंडरपास रस्ता होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अंडरपास रस्त्यामुळे नागरिकांना रस्ता अतिशय सुरक्षितरीत्या ओलांडता येणार आहे. रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी होऊन, नागरिकांना जीवदान मिळणार आहे. यामुळे नागरिकांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे आभार मानले आहेत.