पुणे

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मदार’ या मराठी चित्रपटाने उमटविली मोहोर…!

पुणे शहरात गेले आठवडाभर सुरू असलेल्या २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा ‘ मदार’ या मराठी चित्रपटाने विविध पुरस्कार मिळवित आंतरराष्ट्रीय चित्रपत महोत्सवावर आपली मोहोर उमटविली आहे, तर या वर्षीचा प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बेल्जियम आणि फ्रान्स येथील ‘तोरी अँड लोकिता’ या चित्रपटाला प्रदान करण्यात आला.

सांस्कृतिक शहर अशी ओळख असणाऱ्या पुणे शहरात फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप सोहळा गुरुवारी मुकुंदनगर येथील सकल ललित कलाघर येथे संपन्न झाला, याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेत्री विद्या बालन, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व निर्माते जानू बरवा, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अविनाश ढाकणे, पुणे फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुधीर मुनगुंटीवार म्हणाले, ” महाराष्ट्रात नाट्य, सिनेमा, साहित्य या सर्व क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार सर्व शक्तिनिशी कार्यरत आहे, सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्र जगात १० व्या क्रमांकावर आहे, राज्यातील चित्रपट क्षेत्राच्या प्रगतीसाठी कोल्हापूर येथे नवीन चित्रनगरी उभारण्याबरोबरच राज्य सरकार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’च्या आधारावर फिल्म इक्वीटी स्टॉक एक्सचेंज सुरू करणार आहे, त्याचबरोबर चित्रपट निर्मात्यांना माझे आवाहन आहे, की त्यांनी चित्रपटांमध्ये पर्यावरण हा विषय हाताळला जावा, जेणेकरून नागरिकांमध्ये या विषयी जागरूकता निर्माण होईल.

चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी पुण्यात देखील फिल्म सिटी उभारण्यासाठी राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे केली, यासाठी जागेची उपलब्धता करून दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले,अभिनेत्री विद्या बालन म्हणाल्या, ” हल्ली अनेक जण मोबाईल, विविध सोशल मीडिया यावर चित्रपट पाहता असतात, त्यामुळे चित्रपट महोत्सवात येऊन ते चित्रपट पाहतील का? असा प्रश्न पडतो, मात्र या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने या प्रश्नांचे अतिशय समर्पक उत्तर दिले आहे, सवाई गंधर्व संगीत महोत्सव असो की चित्रपट महोत्सव असो, पुण्यातील नागरिक त्याला भरभरून प्रतिसाद देतात, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.