पुणे

‘रामलल्ला तो आ गये, रामराज्य कब आयेगा’ खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे सत्ताधाऱ्यांवर शरसंधान

पुणे – रामंमदिर आणि प्रभू श्रीराम हा राजकारण आणि निवडणूक प्रचाराचा मुद्दा नाही असे सुनावत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या कवितेतून ‘मंदिर का निर्माण हुवा, रामलल्ला भी विराजमान हुए, अब जिम्मेदारी बनती है और सवाल भी उठता है, रामलल्ला तो आ गये अब रामराज्य कब आयेगा’ असा सवाल केला.

संसदेत आज राममंदिरासंदर्भांत मांडण्यात आलेल्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना खासदार डॉ. कोल्हे यांनी रामंमदिराची निर्मिती एक ऐतिहासिक घटना असून ज्यांनी या निर्माण कार्यात योगदान दिले त्या सर्वांचे आणि देशवासियांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर निवडणुकीचा मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारला खडे बोलही सुनावले. ते म्हणाले की, रामंमदिर आणि प्रभू श्रीराम हा राजकारण आणि निवडणूक प्रचाराचा मुद्दा नसून देशाची गौरवशाली परंपरा आहे. धर्मामध्ये राजकारण येता कामा नये आणि राजकारणात धर्म येता कामा नये. कारण धार्मिक कट्टरता राष्ट्राचे नुकसान करते हा जगाचा इतिहास आहे. उलट धार्मिक उदारता राष्ट्राला मानवतेच्या शिखरावर घेऊन जाते आणि मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. कारण हिंदू धर्म उदारता, सहिष्णुतेमुळे जगात वंदनीय आहे याचा हिंदू म्हणून मला स्वतःला अभिमान आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले.

 

मी ज्या महाराष्ट्रातून येतो, त्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करून रयतेचं राज, स्वराज्य निर्माण केलं याचाही मला अभिमान आहे. त्याचबरोबर चंद्रभागेच्या तीरी अठरापगड जातीच्या बांधवांचा, वैष्णवांचा मेळा जमतो आणि एकाच पांडुरंगाच्या चरणी लीन होतो, याचाही मला अभिमान आहे, असे खासदार डॉ. कोल्हे म्हणाले. महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रुढी आणि परंपरांच्या कर्मकांडाच्या चौकटी झुगारून मानवतेला अधिष्ठान मिळवून दिले. त्यामुळे राममंदिर हा आस्थेचा, भक्तीचा विषय आहे. भक्तीमार्गात माध्यम, साधन आणि साध्य या तीन बाबी महत्त्वाच्या असतात, अशा धर्माची व्याख्या सांगताना खासदार डॉ. कोल्हे यांनी, आपण पूजापाठ, जप, आरती करतो ते माध्यम आहे, त्यासाठी आपण समोर मूर्ती किंवा फोटो ठेवतो ते साधन आहे आणि परमात्म्याचा आत्म्याशी संवाद हे साध्य आहे, असे सांगितले.

 

राममंदिर हे साध्य नसून साधन आहे असे खासदार डॉ. कोल्हे यांनी बजावताना, प्रभू रामचंद्रांच्या आदर्शानुसार आचरण करणे हे साध्य असले पाहिजे. आपण एकवचनी, एक पत्नी प्रभू रामचंद्रांचे भक्त म्हणवता तर दरवर्षी २ कोटी युवकांना रोजगार आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या वचनांचे काय झाले? २०२२ पर्यंत प्रत्येकाला पक्के घर देण्याच्या घोषणेचे काय झाले? असे तिरकस सवालही केले. सर्वांकडे समान न्याय दृष्टीने पाहणे हा प्रभू रामचंद्रांचा महत्वाचा गुण. पण आज प्रत्येक देशबांधव पाहात आहे की, इन्कमटॅक्स, सीबीआय आणि ईडीची कारवाई फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांवर होते आणि या नेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला की, कारवाईचे नामोनिशाणही राहात नाही. याला समान न्याय दृष्टी म्हणायचे का? असं विचारत सद्यस्थितीवर नेमकं बोट ठेवलं.

राममंदिरासारख्या विषयावर बोलत असतानाही खासदार डॉ. कोल्हे यांनी रामायणातील प्रसंगांशी आजच्या परिस्थितीची समर्पक तुलना केली. ते म्हणाले की, रावणाने कांचनमृगाची लालूच दाखवत सीता हरण केले होते. आता इन्कमटॅक्स, सीबीआय आणि ईडीचा धाक दाखवून निवडणूक चिन्ह, पक्ष आणि नेत्यांचे हरण केले जाते आहे. त्यामुळे जशी हनुमानाने समुद्र पार करून श्रीरामांची अंगठी दाखवून सीतामातेच्या मनात विश्वास निर्माण केला होता, तशी खोटी आश्वासने, खोटी गॅरंटी आणि प्रपोगंडा यांचा समुद्र पार करून मतदारांना विश्वासाची अंगठी द्यावी लागेल याची डॉ. कोल्हे यांनी जाणीव करून दिली.

 

नेहमीप्रमाणे खासदार डॉ. कोल्हे यांनी आपल्या खास शैलीत सादर केलेल्या कवितेच्या माध्यमातून ‘मंदिर का निर्माण हुवा, रामलल्ला भी विराजमान हुए, अब जिम्मेदारी बनती है और सवाल भी उठता है, रामलल्ला तो आ गये अब रामराज्य कब आयेगा’ असा सवाल करीत लोकसभेच्या अखेरच्या अधिवेशनात आपली छाप उमटवली.