पुणे

राष्ट्रवादीच्या ग्राहक समितीचे संघटन कौतुकास्पद : बसवराज पाटील

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस मधील विविध सेलच्या तुलनेत ग्राहक संरक्षण समितीने आपल्या कामाच्या व संघटन कौशल्याच्या जोरावर अल्पावधीत स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले ही बाब पक्षाच्या दृष्टीने कौतुकास्पद असल्याचे मत राष्ट्रवादी च्या सर्व सेलचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी येथे व्यक्त केले. तुमचा जोश पाहून तुम्ही निश्चित ही चळवळ घराघरापर्यंत पोहोचवणार. तसेच या चळवळीत वकिलांनाही समाविष्ट करावे असे पाटील यांनी सांगितले.

मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जागतिक ग्राहक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे अध्यक्ष बसवराज पाटील, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, ग्राहक समितीचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.

संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ग्राहक चळवळीचा मुख्य गाभा असणाऱ्या ग्राहकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यावर भर देण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी काम करत असताना असे काम करा की कोणी काहीही आरोप केले तर आमचा कार्यकर्ता निर्दोष आहे अशा प्रकारची भूमिका येथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. ते काम आपण जर करू शकलो, तो समन्वय साधू शकलो तर निश्चितपणे या राष्ट्रवादीची ग्राहक संरक्षण समिती ही उद्याच्या कालखंडातील राष्ट्रवादीची भक्कम समिती पार्टी बळकट करणारी ठरू शकेल असे मत जेष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बसवराज पाटील, घनश्याम शेलार, ग्राहक समितीचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी, मुंबईचे अध्यक्ष विजय देसाई, प्रवक्ते महेश चव्हाण, बाळासाहेब झावरे, अनिता गवळी, अशोक आव्हाळे इ.अनेक मान्यवर पदाधिकारी,कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण चव्हाण यांनी केले.