पुणे शहरात बेकायदा सावकारी, आर्थिक फसवणूक आणि मालमत्ता बळकावण्याच्या कथित रॅकेटचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी आठ नागरिकांनी थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून तपासासाठी विशेष पोलिस पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, काही संशयित व्यक्ती आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना जाळ्यात ओढून बेकायदेशीर सावकारी करत असल्याचा आरोप आहे. कर्जाच्या बदल्यात जादा व्याज आकारणे, मालमत्तांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणे, तसेच दबाव टाकून पैसे उकळण्याचे प्रकार घडत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, विरोध करणाऱ्यांना विविध गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या धमक्या देणे आणि न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर करून मानसिक छळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्तांनी सर्व तक्रारदारांची बाजू ऐकून घेतली असून आर्थिक व्यवहार, कागदपत्रे आणि मालमत्तांशी संबंधित पुराव्यांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील नागरिकांना आवाहन केले आहे की, फसवणूक किंवा छळ झाला असल्यास भीती न बाळगता पोलिस आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा.
दरम्यान, हडपसर परिसरातही अशा प्रकारच्या बेकायदा सावकारीच्या तक्रारी असल्याचा दावा काही नागरिकांकडून केला जात आहे. अशा प्रकारच्या प्रकरणांबाबत माहिती, कागदपत्रे किंवा पुरावे असल्यास संबंधित यंत्रणांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशी कोणाची पळवणूक झाली असल्यास रोखठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलशी संपर्क साधावा.
या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुण्यात बेकायदा सावकारीचे रॅकेट? पोलिस आयुक्तांकडे तक्रार, विशेष पथकाची नियुक्ती
