आईची आर्त विनवणीही कामी आली नाही! ‘मी मंगळसूत्र तोडते, पण मागे ये’ म्हणताच… खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबाचा करुण अंत

Rokhthok Maharashtra 10 0

छत्रपती संभाजीनगरमधून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. खवड्या डोंगरावर एका कुटुंबाचा अक्षरशः डोळ्यांदेखत करुण अंत झाला.
कुणाल चांदगुडे या १९ वर्षीय तरुणाने शुक्रवारी सकाळी घरातील वादानंतर दुचाकीवरून खवड्या डोंगर गाठला. त्याने आई-वडिलांना फोन करून लोकेशन पाठवलं. आई-वडील घटनास्थळी पोहोचले, तेव्हा कुणाल डोंगराच्या अगदी कड्यावर उभा होता.
मुलाला वाचवण्यासाठी आई संगीता यांनी हात जोडून विनवणी केली. ‘तुला वडील नको असतील तर आपण दोघी राहू… मी तुझ्या पाया पडते, पण मागे ये,’ अशी आर्त हाक त्यांनी दिली. मात्र कुणाल ऐकायला तयार नव्हता.
अखेर वडील मुरलीधर यांनी धाडस करून कुणालचा हात पकडला आणि त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र झटापटीत दोघांचाही तोल गेला आणि ते खोल दरीत कोसळले.
हे पाहून आई संगीता यांनीही दरीकडे धाव घेत स्वतःला झोकून दिलं. या घटनेत मुरलीधर, संगीता आणि कुणाल या तिघांचाही मृत्यू झाला.
कुणालने हप्त्यावर आयफोन घेतला होता आणि त्याच्या हप्त्यांमुळे तो आर्थिक तणावात होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र या दुर्दैवी घटनेमागचं नेमकं कारण काय, याचा तपास एमआयडीसी वाळूज पोलीस करत आहेत.

https://www.instagram.com/rokhthokmaharashtra/reel/DcVSUP0OtlL/

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.