*५० वृक्षांची हरित वारी; पर्यावरण संवर्धनाचा रोटरीचा निर्धार कनिफनाथ मंदिर टेकडीवर २० फूट उंचीची देशी वृक्षांची लागवड; जागतिक तापमानवाढीविरोधात जनजागृती*

Rokhthok Maharashtra 3 0

होळकरवाडी , दि. ३० : पर्यावरणाचे ढासळते संतुलन, वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढीचे संकट लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ हडपसरतर्फे होलकरवाडी येथील कनिफनाथ मंदिर टेकडीवर वृक्षारोपण व पर्यावरण प्रदूषण प्रतिबंध जनजागृती अभियान राबविण्यात आले. रविवारी (३० ऑगस्ट) सकाळी सात वाजता झालेल्या या उपक्रमात तब्बल ५० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.

या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेवक रोटेरियन प्रशांत ‘मामा’ तुपे ( अध्यक्ष हडपसर-मुंढवा प्रभाग समिती ) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटेरियन अध्यक्षा डॉ. अनुराधा सचिन जाधव होत्या. विशेष म्हणजे, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने केवळ औपचारिक वृक्षारोपण न करता सुमारे २० फूट उंचीची ५० झाडे ५० पूर्वखोदलेल्या खड्ड्यांमध्ये लावण्यात आली. यामध्ये पिंपळ, वड, कापूर, बेल तसेच इतर देशी वृक्षांच्या प्रजातींचा समावेश होता. मोठ्या आकाराची आणि स्थानिक वातावरणाशी सुसंगत झाडे लावल्यामुळे या उपक्रमातून टेकडीच्या हरित क्षेत्रात लक्षणीय वाढ होण्यास मदत होणार आहे.

यावेळी बोलताना रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. अनुराधा सचिन जाधव यांनी वृक्षारोपण ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता ती प्रत्येक नागरिकाची पर्यावरणाप्रती असलेली जबाबदारी बनली पाहिजे, असे प्रतिपादन केले. वाढते वायुप्रदूषण, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि जागतिक तापमानवाढीचा वाढता धोका यामुळे आगामी पिढ्यांसमोर गंभीर आव्हाने निर्माण होत आहेत. त्यावर प्रभावी उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

“आज लावलेले प्रत्येक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली ऑक्सिजनची आणि सुरक्षित पर्यावरणाची हमी आहे,” या भावनेतून नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले.नगरसेवक प्रशांत ‘मामा’ तुपे यांनी रोटरी क्लबच्या या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले. अशा विधायक सामाजिक कार्यासाठी आपल्या स्तरावर तसेच पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शक्य ती सर्व मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पर्यावरण संरक्षणासाठी सामाजिक संस्था, नागरिक आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या उपक्रमाला रोटरी सदस्य, त्यांचे कुटुंबीय तसेच टेकडी वर येणारे निसर्गप्रेमी लोकजणांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यावेळी सचिव अनिल रासकर, खजिनदार अभय बेकनाळकर, कुमार मामा विधाते, नंदू जगताप, किशोर जांभेकर, शंकर सावंत, डॉ. सचिन जाधव, जितेंद्र मोहन, राजश्री पट्टार, सुरेंद्र पटवर्धन, यशवंत कुलकर्णी, प्रताप थोरात, विजयचंद्र थोरात, नीलिमा मामी विधाते, शुभम चौरसिया, मुकुल सिन्हा तसेच रोटरी क्लबचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

५० झाडे, ५० खड्डे आणि पर्यावरण संवर्धनाचा एकच संकल्प या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ हडपसरने सामाजिक बांधिलकी बरोबरच पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. कानिफनाथ मंदिर टेकडीवर उभी राहणारी ही हिरवाई भविष्यात पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.