पुण्यात भाईगिरीच्या नादात पिस्तूल हातात घेतलं अन् अचानक गोळी सुटली! मित्राच्या मांडीत घुसली गोळी
पुण्यात भाईगिरी करण्याच्या नादात पिस्तूल हाताळणे तीन तरुणांच्या चांगलेच अंगलट आले आहे. आंबेगाव पठार परिसरातील साई सिद्धी चौकात मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
संकेत गोरक्ष चोरघे, सनी ऊर्फ संदीप दीपक आणि अविनाश दादासो मोरे हे तिघे एकत्र आले होते. यावेळी संकेत चोरघे याने त्याच्याकडील पिस्तूल इतरांना दाखवले. त्यानंतर पिस्तूल हाताळताना अचानक चाप दाबला गेला आणि गोळी थेट सनीच्या मांडीत घुसली.
गोळी सुटताच संकेत चोरघे घटनास्थळावरून पसार झाला. तर अविनाश मोरे याने जखमी सनीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातून पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास सुरू केला.
या प्रकरणी अविनाश मोरे याला अटक करण्यात आली असून, संकेत चोरघे, सनी दीपक आणि अविनाश मोरे या तिघांविरुद्ध आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे संकेत चोरघे याच्यावर यापूर्वीही आर्म्स अॅक्टअंतर्गत कारवाई झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पिस्तूल कुठून आले आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.





