प्रेमसंबंध उघड होण्याची भीती… नवजात बाळाची गळा आवळून हत्या!
प्रेमसंबंध उघड होतील या भीतीने एका आईने अवघ्या एक दिवसाच्या नवजात बाळाची गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमध्ये समोर आला आहे. बाळाला जन्म देण्यासाठी महिला मध्यरात्री प्रियकरासोबत शेतात गेली, मात्र जन्मानंतर तिने जे केलं, त्याने माणुसकी हादरली आहे.
गांधीनगर जिल्ह्यातील या घटनेत २१ वर्षीय महिला आणि तिचा ३२ वर्षीय प्रियकर पोलिसांच्या अटकेत आहेत. महिलेचे लग्न पाच वर्षांपूर्वी झाले होते, मात्र पतीसोबत मतभेद झाल्याने ती दीड वर्षापासून माहेरी राहत होती. याच काळात तिचे कालाजी नावाच्या विवाहित व्यक्तीसोबत प्रेमसंबंध जुळले.
१४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर शौचास जाण्याचे कारण सांगून महिला घराबाहेर पडली आणि प्रियकरासोबत शेतात पोहोचली. तिथे तिने नवजात मुलीला जन्म दिला. मात्र बाळाच्या रडण्यामुळे प्रेमसंबंध उघड होतील, या भीतीतून तिने बाळाचा गळा आवळल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
त्यानंतर बाळाला शेतातील नाल्यात टाकण्यात आले. गंभीर अवस्थेत बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात गळा आवळून हत्या झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून, देहगाम पोलीस पुढील तपास करत आहेत.





