पुण्यात बोगस कॉलेजचा भांडाफोड! 7 वर्षे पालकांची फसवणूक हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

Rokhthok Maharashtra 2 0

पुणे… शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे शहर. पण याच पुण्यात आता शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोगस शाळांच्या रॅकेटनंतर आता थेट बोगस कॉलेजचे रॅकेट उघडकीस आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील ओम साई बहुउद्देशीय संस्था या संस्थेच्या माध्यमातून पुण्यातील विमाननगर आणि हडपसर परिसरात स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज ही कनिष्ठ महाविद्यालये चालवली जात होती. मात्र या कॉलेजांना शासनाची कोणतीही वैध मान्यता नसल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
तपासात असे समोर आले की, जळगाव आणि पुणे जिल्ह्यातील इतर शाळा-महाविद्यालयांच्या मान्यतापत्रांमध्ये छेडछाड करून बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल सात वर्षे म्हणजे २०१९ ते २०२६ या कालावधीत ही महाविद्यालये सुरू होती.
विशेष म्हणजे, हजारो विद्यार्थी आणि पालकांना या फसवणुकीची कल्पनाही नव्हती. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून पालकांनी लाखो रुपयांची फी भरली, मात्र त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आता समोर येत आहे.
या प्रकरणी संस्थेच्या तत्कालीन मुख्याध्यापकांविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच संबंधित कॉलेजांनी वर्गांना टाळे ठोकल्याची माहिती समोर आली आहे.
आता प्रश्न असा आहे की, सात वर्षांपासून ही बोगस महाविद्यालये सुरू असताना शिक्षण विभाग झोपला होता का? या संस्थांना कुणाचे राजकीय किंवा प्रशासकीय अभय होते का? आणि हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का?
पुण्यात आधी बोगस शाळा, त्यानंतर इंटिग्रेटेड कॉलेज आणि आता बोगस कॉलेजचा पर्दाफाश झाल्याने संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.