भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावला! | बीडमध्ये तरुण हॉटेल चालकाची चाकूने हत्या

Rokhthok Maharashtra 17 0

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय हॉटेल चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
मृत तरुणाचे नाव विलास नवनाथ घुले असून तो आपल्या मित्रासोबत टाकळी येथे हॉटेल चालवत होता. २० जून रोजी हॉटेलमध्ये बसलेल्या एका ग्राहकाला अनैतिक संबंधाच्या वादातून काही जणांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
जीव वाचवण्यासाठी संबंधित व्यक्ती पळू लागल्यानंतर हॉटेल चालक विलास घुले आणि त्याचे सहकारी भांडण सोडवण्यासाठी त्यांच्या मागे गेले. मात्र मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या विलासलाच याची मोठी किंमत मोजावी लागली.
“तू आमच्यामध्ये पडू नकोस” असे म्हणत आरोपींनी धारदार चाकूने विलासच्या पोटात वार केला. गंभीर जखमी झालेल्या विलासचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी मोठा आक्रोश करत केज शहरात रास्ता रोको आंदोलन छेडले. सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.