चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची भरारी आमदार शेखर निकम यांच्या हस्ते VR लॅब व 3D AI शैक्षणिक उपक्रमांचे उद्घाटन; उपक्रमांसाठी १ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर

Rokhthok Maharashtra 3 0

चिपळूण :(विलास गुरव) चिपळूण–संगमेश्वर मतदारसंघातील विद्यार्थ्यांना आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून कोयना भूकंप पुनर्वसन निधी योजना सन २०२५–२६ अंतर्गत जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाधारित शैक्षणिक उपक्रमसाठी 1 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला असून या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) लॅब (रु. 70 लाख निधी) आणि अंगणवाड्यांमध्ये 3D आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञान (रु. 90 लाख निधी) उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सावर्डे येथे पार पडले.
१० जिल्हा परिषद शाळांमध्ये VR लॅब; ५० अंगणवाड्यांमध्ये 3D AI तंत्रज्ञान या उपक्रमांतर्गत चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील 5-5 याप्रमाणे १० जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये इंटरॲक्टिव्ह पॅनेलसह व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) लॅब उभारण्यात येणार आहेत. VR तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान, अवकाश, विविध शैक्षणिक संकल्पना आणि अभ्यासक्रमातील विषयांचा आभासी अनुभव घेता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष अनुभवाच्या जवळ जाणाऱ्या पद्धतीने शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
तसेच, चिपळूण व संगमेश्वर या दोन्ही तालुक्यातील ५० अंगणवाड्यांमध्ये इंटरॲक्टिव्ह मॅटसह नावीन्यपूर्ण 3D AI तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 3D ॲनिमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) आणि खेळातून शिक्षण अशा माध्यमांचा वापर करून बालकांची शिकण्याची प्रक्रिया अधिक रंजक, आनंददायी आणि कृतीशील करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. लहान वयातच बालकांमध्ये जिज्ञासा, निरीक्षणक्षमता आणि शिकण्याची आवड विकसित होण्यास या उपक्रमाची मदत होऊ शकते.
शैक्षणिक सुविधांमधील तंत्रज्ञानाची दरी कमी करण्याचा प्रयत्न आपले मनोगत व्यक्त करताना आमदार शेखर निकम म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केवळ मोठ्या शहरांतील शैक्षणिक संस्थांपुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचावा, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शाळांमधील डिजिटल शिक्षणाला चालना देतानाच अंगणवाडी स्तरावर बालकांना तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची ओळख करून देण्याचा प्रयत्न यामधून केला जात आहे.

“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, प्रत्येक बालकाला शिकण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध व्हावे आणि बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवी पिढी सक्षम व्हावी, यासाठी शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे,” अशी भूमिका या उपक्रमामागे आहे.

यावेळी जयंतशेठ खताते, नितीन ठसाळे, चिपळूण गटशिक्षणाधिकारी देसाई साहेब, संगमेश्वर गटशिक्षणाधिकारी परीट साहेब, अशोकभाई कदम, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम, रमेश राणे, देवरुख पंचायत समिती उपसभापती प्रफुल बाईत, राजेंद्र पोमेंडकर, राजेंद्र सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, धामापुर जिल्हा परिषद सदस्य सुशिल भायजे, चिपळूण पंचायत समिती सदस्य शौकत भाई माखजनकर, बैकर मॅडम, शरद शिगवण, मेघा इंगवले, संगमेश्वर पंचायत समिती सदस्य मंगेश बांडागळे, प्रिया सुवरे, घवाळी मॅडम, असुर्डे सरपंच पंकज साळवी, दिशा दाभोळकर, गणपत चव्हाण, जमीर मुल्लाजी, सावर्डे सरपंच बागवे मॅडम, अशोक काजरोळकर, जागृती शिंदे, मयूर खेतले, आदिती देशपांडे, तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस आदि उपस्थित होते.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.